
स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या किताबी लढतीत पिछाडीवर पडल्यानंतरही राखेतून उठून रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत फिनिक्स भरारी घेतली. नदालने ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदाला गवसणी घालून कारकिर्दीतील 21व्या ग्रॅण्डस्लॅम किताबावर नाव कोरून इतिहास घडविला. सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडरर व सर्बियाचा नोव्हाक जोकोवीच यांच्या 20-20 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाला मागे टाकत राफेल नदाल 21 ग्रॅण्डस्लॅम किताब जिंकणार जगातील पहिला टेनिसपटू ठरला, हे विशेष.
कोर्टवर अखेरच्या क्षणापर्यंतचा थरार… गुणांसाठी रंगलेला पाठशिवणीचा खेळ… उभय खेळाडूंच्या पाठिराख्यांच्या जिवाची होत असलेली घालमेल आन् डोळ्यात साठवून ठेवावा असा ऑस्ट्रेलियन ओपनचा रविवारी झालेला संस्मरणीय अंतिम सामना म्हणजे टेनिसप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरला. या किताबी द्वंद्वात दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत डॅनिल मेदवेदेवला हरवत कारकिर्दीत दुसऱयांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले. तब्बल 5 तास 24 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेवचा चिवट प्रतिकार 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 असा मोडून काढला. या विजेतेपदासह नदालच्या खात्यात आता सर्वाधिक 21 ग्रॅण्डस्लॅम पदके जमा झाली आहेत. याआधी त्याने 2009मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनचे पहिले विजेतेपद पटकावले होते. राफेल नदालपेक्षा 10 वर्षांनी तरुण असलेल्या मेदवेदेवने पहिले दोन सेट जिंकून अर्ध्याहून अधिक लढाई जिंकली होती. मात्र झुंजार वृत्तीच्या नदालने जिद्द आणि अनुभवाची शिदोरी काय असते हे अवघ्या टेनिस जगताला दाखवून दिले.
विश्वविक्रमी नदालची ग्रॅण्डस्लॅम कामगिरी
फ्रेंच ओपन (13 विजेती पदे):ः 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018,2019, 2020
विम्बल्डन (2 विजेती पदे):ः 2008, 2010
यूएस ओपन (4 विजेती पदे): 2010, 2013, 2017, 2019
ऑस्ट्रेलियन ओपन (2 विजेती पदे):ः 2009, 2022





























































