पुनर्विकासाच्या चर्चेने रघुवंशी मिलमधील छोटे व्यापारी धास्तावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोअर परळ येथील रघुवंशी मिलमधील सुमारे ६.५ एकर जागेचा पुनर्विकास केला जाणार आहे, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या चर्चेने तिथले छोटे व्यापारी धास्तावले आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली आपल्याला येथून हाकलवले जाईल, अशी भीती त्यांना वाटते. पुण्यातील नामवंत बिल्डर अविनाश भोसले या जागेचा पुनर्विकास करण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.

रघुवंशी मिलमधील ६.५ एकर जागेवर छोटय़ा व्यापाऱयांची इंटेरिअर स्टोअर्स आणि छोटी हॉटेल्स आहेत. बिल्डर भोसले करत असलेल्या पुनर्विकासात छोटय़ा व्यापाऱयांना तेवढीच जागा दिली जाणार असून त्याबरोबर पार्किंगची व्यवस्थाही मिळणार आहे. प्रकल्पाला उशीर झाल्यास मार्केट रेटप्रमाणे त्यांना भाडे देण्यात येईल, असे भोसले यांनी रघुवंशी कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या पुनर्विकासात अनेकांचे गुंतागुंतीचे हितसंबंध आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पाबाबत सगळय़ाच भागधारकांना माहिती दिलेली नाही, असे दिसते. त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात. म्हणून आमच्या कंपनीला आता या पुनर्विकासात काहीही रुची राहिलेली नाही,’ असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

जागा मिलची की, ट्रस्टची?

ज्या जागेच्या पुनर्विकासाची चर्चा आहे ती जागा नक्की कुणाची याबाबत पुरता गोंधळ आहे. रघुवंशी मिलची जागा ही खिमजी भगवानदास चॅरिटेबल ट्रस्टची आहे. ही जागा रघुवंशी मिलला लीजवर देण्यात आली होती. लीज करार २००८ साली संपला. मात्र, जागा लीज दिलेली असताना रघुवंशी मिलने आतील जागा अनेक छोटय़ा व्यापाऱयांना विकल्या. याबाबत ट्रस्टने या छोटय़ा व्यापाऱयांना जागा सोडण्याची नोटीस बजावली आहे. याबाबतचा खटला दिवाणी आणि मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे.