मध्यमवर्गीयांना वाहनसौख्य देणारा ‘हमारा बजाज’ हरपला; राहुल बजाज यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमारा बजाज’ हे ब्रीद घेऊन घराघरात ‘बजाज’ ब्रॅण्ड पोहचविणारे बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, वाहन उद्योगाचा आधारवड राहुल कमलनयन बजाज यांचे आज निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. कोटय़वधी मध्यमवर्गीयांना वाहनसौख्य देणारे राहुल बजाज हे निर्भीड, स्पष्टवक्ते, संवेदनशील आणि सामाजिक जाणिवांशी नाळ जुळलेले उद्योगपती होते. राहुल बजाज यांच्या निधनाने सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात राजीव, संजीव हे दोन मुले, मुलगी सुनैना, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

राज्यसभा सदस्य, ‘पद्मभूषण’ सन्मान

रोखठोक स्वभाव असलेले राहुल बजाज यांना उद्योगक्षेत्रातील योगदानाबद्दल 2001 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2006 ते 2010 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआय) अध्यक्ष म्हणून त्यांची दोनवेळा निवड झाली. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

  • पद्मभूषण राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
  • ते 50 वर्षे आकुर्डी येथील बजाज कारखाना परिसरातच कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. आज दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
  • राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा जमनालाल बजाज यांनी 1926 मध्ये मुंबईत बजाज ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली. राहुल बजाज यांचे वडील कमलनयन बजाज यांनी 1940 मध्ये बजाज ऑटोची स्थापना केली. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधी शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर हॉर्वर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’ केले. 1968मध्ये ते बजाज ऑटोचे सीईओ झाले. तेव्हा ते देशातील सर्वात तरुण सीईओ होते. नंतर ते अध्यक्ष झाले.

स्कूटर म्हणजे बजाज

राहुल बजाज यांनी तब्बल 50 वर्षे बजाज ऑटोची धुरा सांभाळली. त्यांनी दुचाकी आणि तीनचाकी वाहनांमध्ये क्रांती केली. स्कूटर म्हणजे बजाज, ऑटो रिक्षा म्हणजे बजाज हे समीकरणच बनले. कोटय़वधी मध्यमवर्गीयांचे दुचाकी वाहनांचे स्वप्न राहुल बजाज यांच्यामुळे पूर्ण झाले. पिंपरी-चिंचवड परिसरातील आकुर्डी येथे बजाज ऑटोची सुरुवात झाली. त्यानंतर संभाजीनगरातील वाळूज आणि उत्तराखंडच्या पंतनगरमध्ये बजाज ऑटोचे प्लाण्ट उभे राहिले. बजाज ऑटो ही जगातील तिसऱया क्रमांकाची ऑटोमोबाईल कंपनी बनली. रिक्षा उत्पादनात आजही बजाज पहिल्या क्रमांकावर आहे. 1965 मध्ये 2 कोटींवरून सुरू झालेली बजाजची उलाढाल 2022 मध्ये 12 हजार कोटींवर पोहोचली. स्कूटरबरोबर बाईक उत्पादनातही बजाजने भरारी घेतली. पल्सर, अॅव्हेंजर, कावासाकी बाईक लोकांच्या पसंतीस उतरली. रिक्षाबरोबर पिअॅगो, टेम्पो, कार, इलेक्ट्रिक स्कूटर याचेही उत्पादन केले. राहुल बजाज यांनी 50 वर्षांनंतर एप्रिल 2021 मध्ये बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नीरज बजाज यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. मुलगा राजीव बजाज हे ‘सीईओ’ आहेत.

कोरोना काळात 100 कोटींची मदत

  • सामाजिक भान जपणारे उद्योगपती अशी राहुल बजाज यांची ओळख होती. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव मदत केली. संभाजीनगरात मोठे हॉस्पिटल उभारले.
  • देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि पहिला लॉकडाऊन लागला तेव्हा त्यांनी 100 कोटींची मदत केली होती.

जाहीर कार्यक्रमात राहुल बजाज यांनी जेव्हा अमित शहांना सुनावले होते…

यशस्वी उद्योजक असलेले राहुल बजाज हे कोणतेही सरकार असो ते स्पष्टपणे मते मांडत असत. 30 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबईमध्ये इकॉनॉमिक टाइम्सच्या पुरस्कार कार्यक्रमात राहुल बजाज यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुनावले होते. त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. लिन्चिंगच्या घटना, प्रज्ञा ठाकूर प्रकरणावरही त्यांनी थेट प्रश्न विचारले होते. राहुल बजाज म्हणाले होते, ‘माझे नाव राहुल हे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठेवले आहे. माझ्या आजोबांनी महात्मा गांधीजींबरोबर देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात योगदान दिले होते. मी नेहमी कोणतेही सरकार असो प्रश्न विचारत आलो आहे. यूपीए सरकारच्या काळात टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. तुमच्या सरकारला प्रश्न विचारण्याची लोकांना मुभा का नाही ? सध्याच्या सरकारने भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे’, असे  राहुल बजाज यांनी सुनावले होते.

राहुल बजाज हे हिंदुस्थानी उद्योग जगताचे नायक होते. त्यांच्या कारकिर्दीमुळे देशाचे कॉर्पोरेट क्षेत्र मजबूत झाले. त्यांच्या निधनाने उद्योग जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

राहुल बजाज हे उद्योग आणि वाणिज्य जगतातील उल्लेखनीय योगदानासाठी स्मरणात राहतील. व्यवसायाच्या पलीकडे त्यांना समाजसेवेचीही आवड होती. त्यांचे संवाद कौशल्य उत्तम होते. त्यांच्या निधनाने दुःख झाले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

यशस्वी उद्योजक, समाजसेवक आणि बजाजचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांनी नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले. त्यांच्यासोबत माझे अनेक वर्षांपासूनचे व्यक्तिगत संबंध होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाबरोबरच औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराण्याचे आणि बजाज उद्योग समूहाचे योगदान फार मोठे आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात आणि रोजगार निर्मितीतही त्यांचे मोठे योगदान आहे. राहुल बजाज यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे.
– भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

‘पद्मभूषण’ राहुल बजाज यांच्या निधनाच्या वृत्ताने मला मोठा धक्का बसला. स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज यांचे नातू असलेल्या राहुल यांनी बजाज दुचाकी तंत्रज्ञानाने गरीब, मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणले.  हिंदुस्थानने एक उद्योगपती आणि तरुण उद्योजकांसाठीचा दीपस्तंभ गमावला आहे!
– शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

सामान्य नागरिकांना दुचाकी चालवण्याची ताकद देणारी व्यक्ती म्हणजे राहुल बजाज. त्यांच्या निधनाने देशाने दूरदृष्टी असलेल्या एका प्रमुख उद्योजकाला गमावले. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो.
– पी. चिदंबरम, माजी केंद्रीय मंत्री

हिंदुस्थानच्या कॉर्पोरेट इतिहासात सर्वाधिक काळ एकाच उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी संभाळणाऱया राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी बजाजला घराघरात पोहचवून त्यांचा ब्रॅण्ड बनवले. या महान उद्योजकास भावपूर्ण श्रद्धांजली.
– प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय मंत्री