पंतप्रधानांनी देशाचा विश्वासघात केला, हिंदुस्थानचा डेटा अमेरिकेच्या स्वाधीन केला; राहुल गांधींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केरळममधील एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधानांनी अमेरिकेसोबत केलेल्या कराराद्वारे देशाची फसवणूक केली असून हिंदुस्थानच्या सर्वात मौल्यवान ठेवा असलेला डेटा अमेरिकेच्या हवाली केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, “आजच्या युगात डेटा हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. आपल्या १४० कोटी लोकांकडून निर्माण होणारा डेटा हा जगातील सर्वात मोठा साठा आहे. यामध्ये लोकांची वैद्यकीय माहिती, त्यांच्या हालचाली आणि संवादाचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर होणारी कोणतीही चर्चा या डेटावरच आधारित असते. मात्र पंतप्रधान मोदींनी हा सर्व डेटा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हवाली करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.” हिंदुस्थानचा हा मौल्यवान डेटा अमेरिकेला देणे म्हणजे देशाच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

इंधनाच्या मुद्द्यावरून सरकारला धरत राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधानांनी आपली ऊर्जा सुरक्षा गहाण ठेवली आहे. हिंदुस्थानसारख्या शक्तिशाली देशाला आता रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागत आहे, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. हिंदुस्थानने कोणाकडून तेल खरेदी करावे, हे आता अमेरिका ठरवणार आहे. पंतप्रधानांनी ट्रम्प यांना असे आश्वासन दिले आहे की, हिंदुस्थान दरवर्षी अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची आयात करेल, ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा बोजा पडणार आहे.”

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दबावाखाली काम करत आहेत. “पंतप्रधानांनी देशाला निराश केले आहे. जेव्हा त्यांनी अमेरिकेसोबतच्या या करारावर स्वाक्षरी केली, तेव्हा त्यांनी देशाशी प्रतारणा केली,” अशा तिखट शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.