महाविकास आघाडीचे जागावाटप, राहुल गांधी यांचा उद्धव ठाकरेंना फोन

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार, कॉँग्रेस या राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आली आहे. यासंदर्भात कॉँग्रेसचे नेते-खासदार राहुल गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पह्नवरून चर्चा केली.

भाजपची हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा असून यातील जवळपास 40 जागांवर एकमत झाले आहे. येत्या 27 आणि 28 फेब्रुवारीला जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पह्नवरून सविस्तर चर्चा केली. यामुळे येत्या काही दिवसांत मविआच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

शरद पवारांशीही केली चर्चा
शरद पवार यांच्याशीही राहुल गांधी यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. लोकसभेच्या ज्या आठ जागांबाबत मविआच्या राज्यातील नेत्यांत एकमत होऊ शकले नव्हते त्याविषयी उभय नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

वंचितबाबतही सकारात्मक चर्चा
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत कशा प्रकारे सामावून घ्यायचे याबाबतही उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याशी राहुल गांधी यांनी सकारात्मक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.