
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यात आला. यावर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपच्या खासदारांमध्ये शाब्दीक चकमकी झडल्या. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या चर्चेदरम्यान भाजपचे खासदार कमलेश पासवान यांचे कौतुक केले. पासवान हे एक चांगले दलित नेते असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटले. पासवान हे चुकीच्या पक्षात असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं. पासवान यांना राहुल गांधी यांनी ही एकप्रकारे आपल्या बाजूने येण्याची ऑफर दिली असल्याची कुजबूज सुरू झाली. पासवान यांनी ताबडतोब राहुल गांधी यांना उत्तर देत म्हटले ‘काँग्रेस पक्षाची इतकी लायकी नाही के ते आम्हाला खूश करू शकतील.’
बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान भाजपकडून कमलेश पासवान यांना बोलण्याची संधी मिळाली होती. पासवान यांनी आपल्या भाषणात मोदी-योगी सरकारने केलेल्या कामांचे कौतुक करत काँग्रेसवर सडकून टीका केली. पासवान यांनी राहुल गांधी यांना थेट प्रश्न विचारला की 60 वर्षांत काँग्रेस सरकारने देशातील जनतेला मुलभूत सुविधा का दिल्या नाहीत? गरीबी हटाओची घोषणा देणाऱ्या काँग्रेसने गरिबांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी काय केलं? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
पासवान यांच्यानंतर राहुल गांधी बोलायला उभे राहिले होते. यावेळी त्यांनी पासवान यांच्या भागातील दलितांच्या स्थितीबाबत आणि इतिहासाबाबत बोलताना पासवान यांचे कौतुक केले. पासवान हे चांगले दलित नेते आहेत, मात्र ते चुकीच्या पक्षात आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं. राहुल यांनी यावेळी जुन्या संभाषणाचाही उल्लेख केला. पासवान यांनी राहुल गांधी यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभा अध्यक्षांनी त्यांना अडवलं होतं. राहुल यांचं भाषण झाल्यानंतर पासवान यांना संधी देण्यात आली. यावेळी ते म्हणाले की काँग्रेसचे सरकार असताना ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबण्यात आले होते. भाजपने आपल्याला बरंच काही दिल्याचं सांगत पासवान म्हणाले की भाजपने मला 3 वेळा खासदार बनविले आहे. पासवान यानंतर म्हणाले की यांच्या (काँग्रेसची) पक्षाची ही लायकी नाही की मला त्यांच्या पक्षात घेऊन खूश करू शकतील. नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.




























































