मोदी सरकारने अग्निवीर प्रक्रिये अंतर्गत देशातील तरुणांना अल्पावधीसाठी नियुक्त केले. मात्र काँग्रेस या दीड लाख तरुणांना न्याय देईल असे आश्वासन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिले. तसेच संरक्षण क्षेत्रातील सर्व कंत्राटे मोदी सरकारने उद्योजक गौतम अदानी यांना दिली. याबाबत संसदेत जेव्हा मी आवाज उठवला तेव्हा मला बाहेरचा रस्ता दाखवला गेला, माझे घर काढून घेतले. पण मला घराची गरज नाही, कारण या देशातील लोकांच्या मनात माझे घर आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
भाजप आणि आरएसएस द्वेष पसरवत आहेत. परंतु हिंदुस्थानवासियांच्या डीएनएत प्रेम आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. दोन दिवसांच्या ब्रेकनंतर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा छत्तीसगड येथे पोहोचली. त्या वेळी राहुल गांधी बोलत होते. या वेळी त्यांनी एक मोबाईल दाखवला आणि हा मोबाईल चायना मेड असल्याचे सांगितले. तसेच हा मोबाईल उद्योजक हिंदुस्थानात विकतात, त्यातून पैसा कमावतात. पण हा फोन मला छत्तीगडमध्ये बनलेला हवाय, असे ते म्हणाले. मणिपूर अजूनही जळतेय. पण मोदींनी यावर बोलणे आणि तिकडे जाणे टाळले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
मोदींचा फोकस अदानी आणि वर्ल्ड कपवर
देशात शेतकरी आत्महत्यासारखे गंभीर विषय असताना मोदी केवळ अदानीसारख्या उद्योजकांच्या मुलांच्या लग्नात हजेरी लावतात तसेच वर्ल्ड कपवर फोकस करतात, असा आरोपही राहुल गांधी यांनी या वेळी केला.
भारत जोडो न्याय यात्रा छत्तीसगडमध्ये 536 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. राजगड, सक्ती, कोर्बा, सुरजपूर, सुरगुजा आणि बलरामपूर जिह्यात राहुल गांधी जाणार आहेत.