
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामामधील सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करणाऱया ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहरला कोणी सोडले याचे उत्तर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींनी द्यावे, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे. पुलवामा हल्ल्याला दहशतवादी मसूद जबाबदार आहे. पण त्याला सोडण्यासाठी भाजप सरकार जबाबदार असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. ‘ट्विटर’वरून त्यांनी मोदी यांच्यावर पुलवामासंदर्भात प्रश्नांची तोफ डागली.
‘ट्विट’मध्ये 1999मध्ये एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करून ते अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये नेण्यात आले. त्यावेळी आताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे मसूदच्या सुटकेसाठी कंदहारला गेले होते. त्यांनी मध्यस्थी केली. अजहर आणि इतर दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या हवाली कोणी केले? दहशतवाद्यांबरोबर मध्यस्थी कोणी केली, याची माहिती मोदी यांनी शहिदांच्या कुटुंबीयांना द्यावी, असा जळजळीत प्रश्न राहुल यांनी मोदी यांना विचारला आहे.

























































