भ्रष्ट जनता पक्ष, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे; राहुल गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “देशभरात ‘भ्रष्ट’ जनता पक्षाच्या डबल इंजन सरकारांनी जनतेचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. भ्रष्टाचाराबरोबरच सत्तेचा गैरवापर आणि अहंकाराचे विष हे भाजपच्या राजकारणात वरून खालीपर्यंत पसरलेले आहे.”

राहुल गांधी म्हणाले की, “भाजपच्या व्यवस्थेत गरीब, असहाय, मजूर आणि मध्यमवर्गीयांचे जीवन फक्त एक आकडा झाला असून विकासाच्या नावाखाली वसुलीचा कारखाना सुरू आहे. उत्तराखंडमधील अंकिता भंडारीच्या निर्दयी हत्येने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. पण आजही तोच प्रश्न उरतोय, सत्तेच्या संरक्षणाने भाजपचा कोणता व्हीआयपी वाचवला जातोय? कायद्याची समानता सर्वांसाठी समसमान कधी लागू होणार?”

राहुल गांधी म्हणाले, “उत्तर प्रदेशमधील उन्नाव कांडमध्येही संपूर्ण देशाने पाहिले आहे की, सत्तेच्या घमंडात गुन्हेगारांना कसे वाचवले गेले आणि पीडितेला न्याय मिळवण्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागली. इंदूरमध्ये विषारी पाणी पिऊन होणाऱ्या मृत्यूंपासून ते गुजरात, हरियाणा, दिल्लीपर्यंत दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी येत असून सर्वत्र आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.”

ते पुढे म्हणाले, “पुल कोसळतात, रस्ते बुडतात, रेल्वे अपघातांमध्ये संपूर्ण कुटुंब नष्ट होतात आणि भाजप सरकार प्रत्येक वेळी तेच करते, फोटो-ऑप, ट्वीट आणि भरपाईची औपचारिकता. मोदीजींचे “डबल इंजन” चालू आहे, पण फक्त अब्जाधीशांसाठीच. सामान्य हिंदुस्थानींसाठी ही भ्रष्टाचाराची डबल इंजन सरकार विकास नाही, तर विनाशाची गती आहे, जी दररोज कोणाच्या ना कोणाच्या आयुष्याला चिरडतेय.”