एपस्टीन फाईल्स आणि अदानी प्रकरणाच्या दबावावामुळे हिंदुस्थान-अमेरिका करार, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनी केरळमधील भाषणात पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका करत हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी दरवर्षी 9 लाख कोटींच्या अमेरिकन वस्तू खरेदी करण्याचे मान्य केले आहे. यामुळे देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा फटका बसेल. हिंदुस्थान-अमेरिका करार देशाच्या हिताचा नसून तो दबावाखाली करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात त्यांनी दोन कारणे पुढे केली.

पहिले कारण म्हणजे तथाकथित “एपस्टीन फाईल्स”. या फाईल्सच्या माध्यमातून अमेरिकेकडून पंतप्रधानांच्या प्रतिमेवर दबाव आणला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

दुसरे कारण म्हणजे अदानी ग्रुप. “ही सामान्य कंपनी नाही. तिची झपाट्याने झालेली वाढ भाजपाशी असलेल्या जवळच्या संबंधांचे द्योतक आहे. अमेरिकेत अदानी समूहाविरोधात गुन्हेगारी प्रकरण आहे, ज्यामुळे पंतप्रधान आणि भाजपवर दबाव आहे. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधानांवर उघडपणे टीका करू शकतात,” असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी पुढे दावा केला की, या तथाकथित हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारामुळे पंतप्रधानांनी देशाचे भविष्य गहाण ठेवले आहे.

या करारामुळे भारताचे कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्यात आले असून, लहान भारतीय शेतकऱ्यांना अत्याधुनिक अमेरिकन शेतीशी स्पर्धा करावी लागेल. यामुळे रबर, मका आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

तसेच या करारामुळे देशाची ऊर्जा सुरक्षितताही कमकुवत झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदुस्थानला रशिया, इराण आणि इराकसारख्या देशांकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागेल, असा दावा त्यांनी केला. मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना याचे परिणाम लवकरच जाणवतील, असेही त्यांनी नमूद केले.