देशवासीयांनो, कृपया समजून घ्या!अदानीच्या चौकशीमुळे मोदींचे हात बांधलेत!ट्रम्पना उत्तर देत नसल्यावरून राहुल गांधींचा हल्ला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर का देत नाहीत, याचे कारण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सांगितले. ‘अमेरिकेत सुरू असलेल्या गौतम अदानी यांच्या चौकशीमुळे मोदींचे हात बांधले गेलेत. देशवासीयांनो, समजून घ्या,’ असा हल्ला राहुल यांनी केला.

ट्रम्प रोजच्या रोज हिंदुस्थानवर तोंडसुख घेत आहेत. कधी युद्धविरामाचे श्रेय घेत आहेत, तर कधी हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला दूषणे देत आहेत, मात्र पंतप्रधान मोदी चकार शब्द बोलत नाहीत. त्यावरून राहुल यांनी आज हल्ला केला. राहुल यांनी देशवासीयांना संबोधून ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. ‘हिंदुस्थानींनो, कृपया समजून घ्या. ट्रम्प वारंवार धमक्या देत असूनही मोदी गप्प आहेत, त्याचे कारण अदानींची अमेरिकेत सुरू असलेली चौकशी हे आहे. मोदी, अदानी-अंबानी आणि रशियातील तेल कराराचे कनेक्शन चव्हाटय़ावर येईल हीसुद्धा एक भीती मोदींना आहे. त्यामुळेच त्यांचे हात बांधले गेलेत, असे राहुल यांनी म्हटले आहे.