
सामना ऑनलाईन । लंडन
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर असून ते लंडनमधील वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. काल शनिवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधींना विरोध दर्शवण्यासाठी खलिस्तान समर्थक घुसले व त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. घुसखोरांना अखेर पोलिसांनी सभागृहाबाहेर काढले.
लंडनमध्ये 12 ऑगस्टच्या खलिस्तान समर्थकांच्या रॅलीवर हिंदुस्थानने ब्रिटनकडे नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी 1984 च्या शीख दंगलीवर दुःख व्यक्त केले होते. तसेच कोणत्याही हिंसेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे, असे ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक’च्या कार्यक्रमात राहुल यांनी म्हटले होते. राहुल यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी खलिस्तान समर्थकांनी त्यांच्या कार्यक्रमात घुसखोरी केली.
हिंदुस्थानात दलितांना काहीच मिळत नाही. हक्कासाठी आवाज उठवल्यास त्यांना मारहाण केली जाते. हिंदुस्थानला वेगळय़ाच वाटेवर जातेय. जातीयवादी शक्ती देशाची एकात्मताच भंग करीत आहेत.
– राहुल गांधी
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत सध्या तरी विचार करीत नाही
तीन महिन्यांत बदलले राहुल यांचे मन
लंडनमध्ये पत्रकारांनी तुम्ही स्वतःला हिंदुस्थानचे पुढचे पंतप्रधान म्हणून पाहता का? या पत्रकारांच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, मी पंतप्रधानपदाचे स्वप्न मुळीच पाहत नाही. सध्या तरी तसा विचार माझ्या मनात नाही. मी स्वतःला वैचारिक लढा देणारा सैनिक मानतो, हिंदुस्थानात नागरिकांच्या राष्ट्रीयत्वावर, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर धोक्याचे ढग घिरटय़ा घालत आहेत. मला देशाची आणि नागरिकांची सुरक्षा जपायची आहे.



























































