दीड महिन्यांची प्रतिक्षा संपली, राहुल रेखावार बीडचे नवे जिल्हाधिकारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे सभाजीनगरला महापालिका आयुक्त म्हणून गेल्यानंतर दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर बीड जिल्ह्याला अखेर जिल्हाधिकारी लाभले आहेत. राहुल रेखावार हे बीडचे जिल्हाधिकारी या पदावर विराजमान झाले आहेत.

बीड जिल्हाधिकारी पदाची खुर्ची 2 महिन्यांपासून रिक्त होती. जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे पदभार होता. मात्र ते कोणतीही रिस्क घेण्यास तयार नव्हते. सह्यासाठी फाईलचा ढिगारा धूळखात पडला होता. निर्णय होत नसल्याने प्रशासन ढिम्म झाले होते. बीडच्या रिक्त जागेवर येण्यास कोणीच तयार नसल्याचे बोलले जात होते. त्यातच बीड जिल्हा निवडणूक विभागातील घोटाळा ऐरणीवर असल्याने बीड जिल्ह्यात येण्यास अधिकारी धजावत नसल्याने डझनभर वरिष्ठ पदे रिक्त आहेत. अखेर राहुल रेखावार यांनी तो विडा उचलला आहे. ते बीडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. सोमवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.

कोण आहेत रेखावार?
रेखावार हे मूळचे खडकी बाजार, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथील रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथील पीपल्स हायस्कूलमध्ये झाले. बारावीच्या परीक्षेत ते बोर्डात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी राजस्थानमधील पिलानी येथे इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याविषयात अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर रेखावार यांनी भाभा अणुशक्ती केंद्रात काम केले आहे. तसेच ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्येही त्यांनी कामाचा अनुभव घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2011 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत ते देशात 15 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी सुरवातीला राजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सिंधुदुर्गचे सहाय्यक जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही रेखावार यांनी काम पाहिले आहे.