कुळवंडी येथे गावठी दारूनिर्मिती केंद्रावर कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

खेड तालुक्यातील कुळवंडी येथील हातभटटीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून 3 लाख 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. विधान परिषदेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेड तालुक्यात अवैध गावठी दारूचे धंदे सुरू असल्याची तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे.

या विभागामार्फत हातभटटी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी अवैद्य दारू विरोधात गुरुवारी मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील अनेक हातभटटयांवर छापे मारुन गावठी हातभटटी दारूचा मोठा साठा व मुद्देमाल जप्त केला जात आहे. खेड तालुक्यातील कुळवंडी येथे हातभटटी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या नेतृत्वाखाली खेड येथील निरीक्षक, भरारीपथक व चिपळूण विभागाचे कार्यालयाने संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी गावठी दारू व रसायन असा एकूण 3 लाख 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याठिकाणी दारू निर्मितीसाठी लागणारे जवळपास 12 हजार 700 लिटर रसायन व तयार हातभटटीची 70 लिटर दारू जप्त करण्यात आली.

घटनास्थळी कोणीही आढळून आले नसल्याने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पध्दतीने गावठी दारू धंदयांवर कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे, असा इशारा उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी दिला आहे. या गुन्हयांचा पुढिल तपास निरीक्षक श्री.शंकर जाधव करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या