
उदगीर तालुक्यातील हेर येथे देशी दारु विक्री करताना छापा टाकून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नामदेव सारूळे , पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड , दयानंद सूर्यवंशी रात्रीची गस्त घालत होते. उदगीर तालुक्यातील हेर येथील वाघोबा चौकात पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास एका लाल रंगाच्या कारमध्ये देशी दारूचा चोरटा विक्री व्यवसाय सुरू होता. याबाबतची माहिती मिळाल्यावर पथकाने हेर येथील वाघोबा चौकात 06:20 वाजता छापा टाकला. त्याठिकाणी एक लाल रंगाची कार आढळूनन आली . त्या गाडीमध्ये एक व्यक्ती होता.
तसेच गाडीत देशी दारू भिंगरी, संत्रा कंपनीचे 15 बॉक्स आढळून आले. त्यात 180 एमएलच्या 720 बाटल्या आढळून आल्या. लाल रंगाची होंडाई कंपनीची गाडी आणि देशी दारूच्या बाटल्या असा एकूण एक लाख 83 हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडीतील व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.
संचारबंदीच्या काळात नियमांचे पालन न केल्याप्रकरणी दारूची चोरटी वाहतूकआणि विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी रमेश उर्फ छोटू ज्ञानोबा मस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक घोडके हे करत आहेत.




























































