
अलिबाग जिल्ह्यात ३८८ कुष्ठरुग्ण आढळले असून रायगडकरांची चिंता वाढली आहे. मात्र या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कुष्ठरुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील २३ लाख ३० हजार ८७१ जणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षणासाठी ३७५ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १ हजार ९९५ पथके तयार केली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन शारीरिक तपासणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचार सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील ३८८ सक्रिय रुग्णांवर प्रशासनाकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यात अलिबाग तालुक्यात २६ कुष्ठरुग्ण असून कर्जत ४६, खालापूर ४२, महाड २२, माणगाव २८, म्हसळा ८, मुरुड ३, पनवेल ग्रामीण ४६, पनवेल शहर ४३, पेण ३२, पोलादपूर ३, रोहा २१, श्रीवर्धन १०, सुधागड ३३, तळा ४, उरण १० असा कुष्ठरुग्णांचा समावेश आहे.
























































