
सामना ऑनलाईन । लखनौ
गेल्या वर्षभरात अपघात घटल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात सुरक्षित आकडेवारी असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2018 या 12 महिन्यांत रेल्वे अपघातांच्या 75 दुर्घटना घडून 40 जण मृत्युमुखी पडले. ही आकडेवारी मागील वर्षाच्या आकडेवारीपेक्षा कमी आहे.
सप्टेंबर 2016 आणि ऑगस्ट 2017 या काळात रेल्वेचे 80 अपघात झाले असून 249 लोक प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये कानपूरजवळ इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळांवरून घसरून 150 पेक्षा अधिक प्रवासी मरण पावले होते. सप्टेंबर 2013 आणि ऑगस्ट 2014 या कालावधीत 139 रेल्वे अपघातांच्या घटना घडल्या होत्या आणि त्यामध्ये 275 जण मृत्युमुखी पडले होते.
चांगले रूळ, अद्ययावत कोच आणि गेल्या चार वर्षांत देखभाल, दुरुस्तीवर दिलेले लक्ष यामुळे अपघातांच्या घटना कमी झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय सातत्याने सुरक्षिततेचा घेतलेला आढावा, कर्मचाऱयांना देण्यात येणारे सेफ्टी ट्रेनिंग या कारणांमुळेही बराचसा सकारात्मक परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षित प्रवासाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वे प्रशासनाने मानवरहीत रेल क्रॉसिंग हटवण्याचा घेतलेला निर्णय. मार्च 2020 पर्यंत देशभरातील सर्वच्या सर्व मानवरहीत रेल क्रॉसिंग हटवण्याचे ध्येय आहे.
summary- railway accident number reduced




























































