
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने आपण चहावाले असून लहानपणी चहा विकल्याचे सांगत असतात. 2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी या मुद्दाचे बरेच भांडवलही केले होते. माहितीच्या अधिकारात मात्र नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वेच्या डब्यात चहा विकल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं उघड झालं आहे. काँग्रेस समर्थक असलेल्या तहसीन पूनावाला यांनी रेल्वे बोर्डाकडे माहिती मागितली होती. रेल्वे बोर्डाला पूनावाला यांनी प्रश्न विचारला होता की नरेंद्र मोदी हे चहा विकत असल्याचे त्यांच्याकडे काही कागदपत्रे किंवा नोंदणी क्रमांक आहेत का ?या प्रश्नाचं उत्तर देताना बोर्डाने त्यांच्याकडे याबाबत काहीही माहिती नसल्याचं कळवलं आहे. एका हिंदी वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
आपण चहा विकून मोठे झालोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही अभिमानाने सांगतात. नुकत्याच एका प्रचारसभेमध्ये त्यांनी चहावाला पंतप्रधान कसा काय होऊ शकतो याचं काँग्रेसला आश्चर्य वाटत असल्याचं विधान केलं होतं. मात्र माहितीच्या अधिकारात मोदी चहा विकत असल्याचा कोणताही पुरावा न मिळाल्याने विरोधकांना 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदींना लक्ष्य करण्यासाठी एक मोठा मुद्दा मिळाला आहे.



























































