
लसीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या म्हणजेच ‘युनिव्हर्सल पास’ असलेल्यांना आता लोकल प्रवासासाठी तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने रेल्वेला यासंदर्भात निर्देश दिले असून पात्र व्यक्तींना तिकीट मिळावे याची जबाबदारी रेल्वे बुकिंग क्लार्कवर सोपविण्यात आली आहे.
राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना 15 ऑगस्टपासून लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यापूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करता येत होता. त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून 18 वर्षांखालील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. आता नुकताच 27 ऑक्टोबरपासून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाही लसीकरण पूर्ण झाल्याचा ‘युनिव्हर्सल पास’ दाखविल्यानंतरच रेल्वे पास देण्याचे आदेश काढण्यात आले. लोकलचे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक असे पास मिळायचा मार्ग मोकळा झाला, परंतु लोकलचे तिकीट मिळण्याचे बंद झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे आता लसीकरण पूर्ण झालेल्यांना सर्व प्रकारची दैनिक तिकिटे, सिंगल आणि रिटर्न तिकिटे विकत देण्याचे आदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या बुकिंग क्लार्कनी लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवाशांना हवे ते तिकीट विकत द्यावे, असे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिले आहेत.
































































