रेल्वे तिकिटांचे घोटाळे रोखणे कठीण, आयआरसीटीसीचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेची प्रवासी वाहतूक मर्यादित प्रमाणात सुरू असली तरी रेल्वे तिकिटांचे दलाल मात्र फुल फॉर्मात आहेत. लॉकडाऊनच्या मे आणि जून महिन्यात मध्य रेल्वेच्या आरपीएफने एकूण 44 दलालांच्या मुसक्या आवळून सुमारे आठ लाखांची रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत. जोपर्यंत तिकिटांची मागणी आणि पुरवठा यामधली मोठी तफावत राहील तोपर्यंत तिकीट घोटाळे रोखणे शक्य नसल्याचे खुद्द आयआरसीटीसीने म्हटले आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. 12 मेपासून रेल्वेने 30 वातानुकुलित एक्स्प्रेस सुरू केल्या आणि 1 जूनपासून वेळापत्रकीय 200 मेल-एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या. या स्पेशल गाड्यांची तिकिटे लागलीच फुल झाल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्याने पथके कामाला लागली. त्यानंतर सायबर सेल आणि अन्य माहितीच्या आधारे आरपीएफने खासगी ट्रॅव्हल एजन्सी तसेच अन्य ठिकाणी धाडी टाकल्या. मध्य रेल्वेच्या सर्व डिव्हिजनने मिळून 44 दलालांवर कारवाई करण्यात आली. त्यात 8,62,191 किमतीची साधी तर 479 प्रवास करण्याजोगी लाइव्ह ई-तिकिटे जप्त केली, मुंबई डिव्हिजनमधून 22 दलाल पकडले असून त्यांच्याकडून 6 लाख 9 हजार 298 रुपये किमतीची तिकिटे जप्त केली आहेत. त्यात 328 लाईव्ह ई-तिकिटे जप्त केली आहेत. या प्रकरणी रेल्वे कायदा कलम 143 नुसार गुन्हा दाखल झाला असल्याचे आरपीएफने म्हटले आहे.

व्हर्च्युअल `आयपी अॅड्रेस’मुळे कारवाई कठीण
याबाबत आयआरसीटीसीचे प्रवक्ते सिद्धार्थ यांना विचारले असता, त्यांनी `आम्ही ट्रान्झक्शन पूर्ण करण्यासाठी ओटीपी, अॅप असे अनेक पर्याय आणले. परंतु जलद गतीने तिकिटांचे फॉर्म भरण्याचे सॉफ्टवेअर बाजारात अगदी सहज उपलब्ध आहे. घोटाळा करणाऱ्यांच्या संगणकांचे आयपी अॅड्रेस शोधणे कठीणच असते. कारण आयपी अॅड्रेस व्हच्र्युअलही बनविता येतो. त्यामुळे जोपर्यंत तिकिटाच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत मिटत नाही तोपर्यंत हा प्रश्न सतावत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.