‘अंगठा’ दाखवून मेल-एक्प्रेसचे तिकीट, दलालांवर अंकुश ठेवण्यासाठी मध्य रेल्वेचा हायटेक उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
biometric attendance system issue no salary in bmc

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेने प्रवासी आरक्षण यंत्रणेतील दलालांची घुसखोरी रोखण्यासाठी नामी शक्कल योजली आहे. अशा ‘पीआरएस’ केंद्रांवर लांबपल्ल्याच्या गाडय़ांची तिकिटे बुक करण्यासाठी येणाऱयांचे अंगठय़ाचे ठसे आणि इतर माहिती घेऊन त्याचा डेटा संग्रही ठेवला जाणार आहे. त्यामुळे तिकीट दलालांवर आपोआपच अंकुश बसणार आहे. तसेच रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांना गुंगी आणून लुटण्याच्या प्रकारांनाही आळा बसणार आहे.

मध्य रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱया प्रवाशांना शिस्तीने प्रवेश मिळावा, त्यात वशिलेबाजी होऊ नये यासाठी जनरल डब्यातील प्रवाशांना बायोमेट्रिक टोकन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एकूण चार बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी टेंडर काढण्यात आले असून लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटी येथे प्रत्येकी एक आणि सीएसएमटीच्या ‘पीआरएस’ केंद्रात दोन बायोमेट्रिक मशीन प्रायोगिक स्वरूपात बसविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी सांगितले.

अशा प्रकारे काम होणार
आदल्या दिवशी ही बायोमेट्रिक टोकन वाटली जातील. त्यानंतर दुसऱया दिवशी गाडी सुटण्याच्या एक तास आधी टोकनप्रमाणे प्रवाशांना रांगेने डब्यात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे आसन पकडण्यासाठी होणारी झटापट तसेच वशिलेबाजीलाही आळा बसणार आहे.

येथे लागणार बायोमेट्रिक मशीन
पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे एकूण चार बायोमेट्रिक मशीन बसविल्या असून दहा ट्रेनमध्ये बायोमेट्रिकनुसार प्रवेश देणे सुरू केले आहे. मध्य रेल्वेही सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱया उत्तरेकडील गाडय़ांसाठी सुरुवातीला बायोमेट्रिकने प्रवेश देणे सुरू करणार आहे.

असामाजिक तत्त्वांना आळा बसणार
मध्य रेल्वेने बायोमेट्रिक पद्धतीचा ‘पीआरएस’ केंद्रासाठीदेखील वापर करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशाला खाद्यपदार्थातून गुंगी आणून लुटण्याचे (ड्रगिंगचे) प्रकार कमी होतील. जनरल डब्यातील प्रवाशांची बायोमेट्रिक नोंद ठेवण्यामुळे प्रवाशांमधून घुसखोरी करणाऱया असामाजिक तत्त्वांना रोख बसणार असल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त अरुण त्रिपाठी यांनी सांगितले. या बायोमेट्रिक टोकनवर प्रवाशाचा फोटो आयडी क्रमांक व प्रवासाची माहितीदेखील असणार असून त्यामुळे दलाल तसेच असामाजिक तत्त्वांना आळा बसणार असल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले.