रेल्वे ट्रॅकवर बसून दारू पिणं बेतलं जीवावर, चार विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू

1641

चांदण्या रात्रीचा आनंद घेत दारू पिण्याची इच्छा चार जणांच्या जीवावर बेतली आहे. रेल्वे ट्रॅकवर दारू प्यायला बसलेल्या चार विद्यार्थ्यांचा ट्रेनने चिरडल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे.

ही भयंकर घटना कोइम्बतूर येथे बुधवारी रात्री घडली. येथील सुलूर-इरुगुर मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर इंजिनिअरिंग शिकणारे पाच विद्यार्थी दारू प्यायला बसले होते. काही दिवसांपूर्वीच सर्वांची परीक्षा संपल्याने आनंदात त्यांनी आधी एका मित्राच्या घरी बसून दारू प्यायली. पण, त्यांना चांदण्यात बसून दारू पिण्याची इच्छा झाल्याने ते फिरत फिरत रेल्वे ट्रॅकवर येऊन पोहोचले. किटकांपासून त्रास होऊ नये म्हणून ते सर्वजण रेल्वे ट्रॅकवरच बसले. त्यातील एक विद्यार्थी मात्र त्यांच्यासोबत न बसता ट्रॅकवर उभा होता. त्याने आपल्या मित्रांना धोक्याचा इशाराही दिला. मात्र, ते तिथेच बसून राहिले. तेवढ्यात तिथून धडधडत जाणाऱ्या अलेप्पी-चेन्नई एक्सप्रेसने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या पाचांपैकी चार जण जागीच चिरडले गेले. सुदैवाने एका विद्यार्थ्याने ट्रॅकच्या बाजूला उडी टाकल्याने तो वाचला.

या विद्यार्थ्यांची ओळख पटली असून डी. सिद्दिक राजा (22), राजशेखर (22), करुप्पासामी (22), गौतम (22) अशी त्यांची नावं आहेत. या चौघांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पाचवा विद्यार्थी एम. विश्वनेश (22) याने ट्रॅकच्या शेजारी उडी टाकल्याने तो बचावला आहे. या भयंकर अपघाताचा धक्का चारही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. या रेल्वे ट्रॅकविषयी वेळोवेळी स्थानिकांना सूचना देण्यात आल्याची माहिती येथील पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. हा रेल्वेमार्ग सर्वाधिक वापरातला मार्ग असून रात्रीच्या वेळी जवळपास 70 ट्रेन्स दर 10 मिनिटांनी इथून ये-जा करतात. तसंच या मार्गावर त्यांचा वेगही जवळपास 100 ते 110 प्रतिकिमी इतका असतो. त्यामुळे नागरिकांना या रेल्वे ट्रॅकच्या आसपास न वावरण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या