ट्रेंड – रेल्वेचे ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज

रेल्वे मंत्रालयाने आपल्या एक्स अकाऊंटवर एक ऑप्टिकल इल्युजन फोटो शेअर केली आहे की, ती पाहून लोकांचे डोळेच विस्फारले आहेत. पहिल्या नजरेत पाहिले तर फोटो अगदी साधा वाटतो. काळय़ा आणि पांढऱ्या रंगाच्या पातळ रेघा एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत, पण या रेषांच्या जाळय़ात एक शब्द लपलेला आहे. रेल्वे मंत्रालयाने युजर्सना थेट आव्हान दिले, ‘या चित्रात तुम्हाला एक शब्द दिसतोय का? शोधून दाखवा!’ आणि बस, मग काय, सोशल मीडियावर सुरू झाली डोळय़ांची कसोटी आणि बुद्धीची कसरत! अनेकांनी फोटोतील शब्द ओळखताना दमछाक झाल्याचे म्हटले आहे. काहींना यावरून रेल्वेची फिरकी घेत लेट गाडय़ा आणि गर्दीवरून मजेशील टोलाही आणला. अखेर हा शब्द ‘वंदे मातरम’ असल्याचा उलगडा एका युजरने केला आहे.