Rain Alert – कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

आठवडाभरापूर्वी धुमशान घालणारा पाऊस पुन्हा जोरदार बॅटिंग करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी सकाळी मुंबईच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नवीन अलर्ट जारी केला आहे. चार दिवस म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र कोकण आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणसह राज्याच्या अनेक भागांत सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. याचदरम्यान वरुणराजा जोरदार हजेरी लावणार आहे. मुंबईत काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुलनेत कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असेल. काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत. त्याच अनुषंगाने हवामान खात्याने सावधानतेचे अलर्ट जारी केले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारी दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

29 ऑगस्ट रोजी दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.