पाऊस आला, कचरा एक हजार मेट्रिक टनांनी वाढला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कचरा व्यवस्थापनसाठी पालिका प्रशासन कठोर उपाययोजना करीत असताना पाऊस सुरू झाल्यापासून फक्त आठ दिवसांत कचऱयाचे प्रमाण तब्बल एक हजार मेट्रिक टनांनी वाढले आहे. त्यामुळे दररोज ७ हजार ५०० मेट्रिक टन जमा होणारा कचरा आता साडेआठ हजार मेट्रिक टनांवर गेला आहे. पावसाळय़ात झोपडपट्टय़ा आणि इतर ठिकाणांवरून वाहून येणाऱया गाळामुळे हे प्रमाण वाढल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र पालिकेसमोर वाढत्या कचऱयाचे प्रमाण कमी करण्याचे पुन्हा आव्हान निर्माण झाले आहे.

मुंबईतील ज्या सोसायटय़ा २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या आहेत आणि ज्यामध्ये १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो अशा सोसायटय़ांनी कचऱयाचे व्यवस्थापन स्वतः करावे असे आदेश पालिकेने दिले आहेत. याला अनेक सोसायटय़ांनी प्रतिसाद दिला असला तरी अजूनही शेकडो सोसायटय़ांनी कचरा व्यवस्थापनास सुरुवात केलेली नाही. तर काही सोसायटय़ांनी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी मुदत मागितली आहे. मात्र ज्या सोसायटय़ा कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने याआधीच स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षणात’ मुंबई पालिका देशात सर्वोत्तम ठरली असल्यामुळे हे यश टिकवण्यासाठी पालिकेला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.

सहा लाखांवर दंड वसूल
कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणाऱया सोसायटय़ांना पोलीस कारवाईसह पाच हजारांपर्यंत दंडही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत केलेल्या कारवाईत पालिकेने तब्बल ६ लाख ७० हजारांचा दंड केला आहे. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अशी झाली कारवाई
-३३०० सोसायटय़ांना नोटिसा
-एक हजार सोसायटय़ांनी कचरा व्यवस्थापन सुरू केले
-५३९ सोसायटय़ांनी वेळ मागितली
-३२६ वर कायदेशीर कारवाई

व्यापक जनजागृती मोहीम राबवणार
मुंबईत सरासरी ९ हजार ५०० मेट्रिक टन कचरा जमा होत होता. मात्र पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण ७ हजार मेट्रिक टनांपर्यंत खाली आले होते. कचरा वर्गीकरण, कचऱयापासून खत निर्मिती, जनजागृती आणि प्रदर्शने यासारखे उपक्रम राबवले. मात्र आता पुन्हा कचरा वाढल्याने जनजागृती मोहीम व्यापक प्रमाणावर राबवणार असल्याचे एका पालिका अधिकाऱयाने सांगितले. यामध्ये नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास आणि पालिकेला सहकार्य केल्यास नक्कीच यश मिळेल असा विश्वासही या अधिकाऱयाने व्यक्त केला.