आजपासून राज्यात पाच दिवस पावसाचे… कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह धो – धो बरसणार

मान्सून पूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला असून बळीराजा हवालदिल झाला आहे. उद्या, सोमवारपासून पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून 18 ते 21 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडू शकतो. यादरम्यान ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, नागरिकांनी वादळी पाऊस पडत असताना आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईकरांनो, छत्री – रेनकोट घेऊन बाहेर पडा

मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांसाठी ढगाळ आकाश राहणार असून संध्याकाळी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता पडण्याची शक्यता आहे. मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सियस आणि 27 अंश सेल्सियस यादरम्यान राहील. येत्या काही दिवसांत शहर आणि आसपास चांगला पाऊस पडू शकतो. त्यामुळे ऑफिसला जाताना छत्री, रेनकोट घेऊन बाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने मुंबईकरांना केले आहे.