
मान्सून केरळच्या दिशेने पुढे सरकत असून त्याच्या प्रभावामुळे सोमवारपासून मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी सोसाटय़ाचे वारेही सुटतील असे हवामान तज्ञांनी म्हटले आहे.
दक्षिण अरबी समुद्रातून गेल्या दोन दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱयांची आगेकूच सुरू झाली आहे. या वाऱ्यांनी लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे. बंगालच्या उपसागरामधील त्यांची प्रगती मात्र थांबली आहे. त्यांना काही तासांमध्ये पोषक वातावरण मिळाले की ते केरळमार्गे हिंदुस्थानात प्रवेश करतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. केरळसह दक्षिणेकडील काही भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस होत आहे. पूर्व हिंदुस्थानातील राज्यांमध्येही पावसाळी वातावरण आहे. 30 मे ते 1 जून या कालावधीत महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे.






























































