
नगर जिह्यातील अकोले आणि पाथर्डी तालुक्यांना शनिवारी तब्बल पावणेदोन तास वळवाच्या पावसाने झोडपले. यावेळी सोसाटय़ाच्या वाऱयाने अनेक घरांचे पत्रे उडून गेले. तसेच अनेक ठिकाणी झाडे पडल्याने विजेच्या खांबांसह तारा तुटून 12 तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
आज सकाळपासूनच अकोले तालुक्यासह ग्रामीण भागात प्रचंड उष्मा वाढला होता. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोसाटय़ाचा वारा सुटून पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तास पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसाने पादचारी, व्यावसायिक, भाजीविक्रेते, शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक केली. कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी, मोहरी या परिसरात सोसाटय़ाचा वारा सुटून अनेक घरांची पडझड झाली असून, फळबागा, जनावरांच्या गोठय़ांचे नुकसान झाले. माणिकदौंडी, कारेगाव, कुत्तरवाडी या भागात हलकासा पाऊस कोसळला. वादळी वाऱयामुळे अनेक गावांची वीज खंडित झाली होती. पाथर्डी शहरातील विजेचा लपंडाव बराच काळ सुरू होता. तालुक्यातील अनेक गावांत 12 तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दुपारी उशिरानंतर हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.































































