
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट कायम आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. कडाक्याच्या थंडीचा सामना करणाऱ्या दिल्लीतील नागरिकांना या आठवड्यात पावसाचाही सामना करावा लागणार आहे. राजधानी दिल्लीतील प्रदूषण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. त्यातच आता हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवल्याने प्रदूषण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर हिंदुस्थानसह राजधानी दिल्लीतही थंडीची लाट कायम आहे. दिल्लीत दिवसभर गारवा कायम असून शनिवारी सर्वात कमी 6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा हे तापमान 2 अंशांनी कमी आहे. राजधानी दिल्लीत रविवारीही थंडीची लाट कायम राहणार असून सोमवारपासून आठवडाभर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण आणखी वाढणार आहे. केंद्र सरकारच्या प्रूदषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स 305 वर पोहचला आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्याही कायम आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.



























































