मान्सून अंदमानात डेरेदाखल; 150 वर्षांत मान्सून लहरी राहिला

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या दीडशे वर्षांत मान्सून वेगवेगळय़ा तारखांना केरळमध्ये पोहोचला. 1918 मध्ये मान्सून 11 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. 1972 मध्ये 18 जून, तर गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहीली तर 2020 ला 1 जून, 2021 ला 3 जून, 2022 मध्ये 29 मे आणि 2023 ला 8 जूनला केरळमध्ये दाखल झाला होता.

मान्सून येत्या 31 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे उकाडय़ाने आणि उन्हाच्या चटक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल तर दुष्काळ आणि भेगा पडलेल्या जमिनीकडे हताशपणे पाहणारा बळीराजा सुखावणार आहे.

गेल्या वर्षी मान्सून अंदान-निकोबारमध्ये 19 मे रोजीच पोहोचला होता, परंतु केरळमध्ये तो उशीरा डेरेदाखल झाला होता. म्हणजेच 8 जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचला होता. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून 28 मे ते 3 जूनदरम्यान केरळमध्ये दाखल होऊ शकतो. दरम्यान, मध्य प्रदेशात मान्सून 16 ते 21 जून आणि राजस्थानात 25 जून ते 6 जुलैपर्यंत येण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशात मान्सून 18 ते 25 जून आणि बिहार तसेच झारखंडमध्ये 18 जूनपर्यंत धडक देऊ शकतो.

– यंदा 104 ते 110 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे बळीराजासाठी ही आनंदाची बातमी आहे. खरीप पिकांसाठी हा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. चारं महिन्यांच्या कालावधीत तब्बल 868.6 मिलीलीटर म्हणजेच 86.86 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.