लातूरमध्ये पावसाला सुरुवात; पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

लातूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. पेरणीसाठी शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. दररोज पाऊस होऊन चांगली ओल तयार झाली तर लगेच पेरणी उरकण्याकडे सर्वांचा कल आहे. अहमदपूर आणि जळकोट तालुक्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस लागवड सुरू केली आहे. लातूर जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पाऊस अधिक झाला. सध्या दररोज पाऊस होत आहे. मृग नक्षत्रात पेरणी व्हावी, असे शेतकऱ्यांचे नियोजन अशते. त्यामुळे पेरणीसाठी आता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

किनगाव परिसरात शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला असून वरुणराजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, शेतीतील नांगरणी, कोळपणी , पाला पाचोळा वेचून काळ्या मातीची मशागत केली जात आहे. मृगाचा पाऊस कधीही येऊ शकतो म्हणून पेरणीसाठी लागणारी अवजारे दुरूस्ती करण्याच्या कामासह खते, बी -बियाणे खरेदी करण्यासाठीही शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बियाणांची उगवण क्षमता चांगली राहावी, जमिनीचा कस वाढावा व उत्पादनात वाढ होण्यासाठी जमिनीची पेरणी पूर्वीची मशागत अत्यंत गरजेची असते. सोयाबीनचे भाव योग्य न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून मशागतीचा खर्चही वाढला आहे. मात्र, पेरणीपूर्व मशागत गरजेची असल्याने उसनवारी करून शेतकरी कामाला लागले आहेत.

अहमदपूर तालुक्यात पाळीसाठी बैलजोडीचा वापर
अहमदपुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेती मशागत केली होती. मात्र गुरुवारी पडलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची पुन्हा मशागत करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी गुढी पाडव्यानंतर उन्हात शेतीची नांगरटी, मोगडा , रेटावेटर आदी कामे केली होती. मात्र, वकाळी पावसामुळे पुन्हा मशागतीची कामे करावी लागत आहेत. शेतात पुन्हा ज्याच्याकडे बैल बारदाना उपलब्ध आहेत, ते शेतकरी बैलजोडीने तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोगडणी , तिररी , रोटर , पाळी आदी पेरणीपुर्व मशागतीची कामे करत आहेत. ट्रॅक्टरचे मशागतीचे दर वाढलेले आहेत, त्यात पुन्हा मशागत करावी लागत आहे. त्यामूळे खर्च वाढत आहे. अनेक शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने मशागतीचे कामे उरकून घेत आहेत.