रंगपट – संवादी संध्याकाळ…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शब्दांच्या माध्यमातून नव्हे; तर मौनातून साधल्या गेलेल्या संवादाविषयी सांगत आहे अभिनेत्री शीतल क्षीरसागर

ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे ‘शब्देंविण संवादु’ असा एक अनुभव एकदा माझ्या ओंजळीत आला. या शब्दांचा अर्थ समजावून देणारी माझ्या आयुष्यात आलेली ‘ती संध्याकाळ’ मी कधीच विसरू शकत नाही. ‘एक होती वादी’ हा चित्रपट मी करत होते आणि यात एका कर्णबधिर मुलीची भूमिका माझ्याकडे चालून आली होती. या भूमिकेचा चांगला अभ्यास करता यावा म्हणून कर्णबधिर व्यक्तींना मी भेटत होते. अशाच एका संध्याकाळी मी शिवाजी पार्कमध्ये एका कर्णबधिर व्यक्तींच्या एका ग्रुपला भेटायला गेले. कर्णबधिर व्यक्ती एकमेकांशी कसा संवाद साधतात, याविषयी मला कुतूहल होते. त्या गजबजलेल्या शिवाजी पार्कमध्ये मला सांगण्यात आलेल्या एका जागेवर मी गेले. शिवाजी पार्क जिमखान्याच्या मागे हिरवळीवर त्या कर्णबधिर लोकांचा ग्रुप बसला होता. आमच्यात संवाद व्हावा म्हणून मी माझ्यासोबत डायरी आणि पेन नेले होते; जेणेकरून लेखनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेले मला कळेल आणि मी बोललेले त्यांना समजेल. शिवाजी पार्कात गजबज असली तरी त्या व्यक्तींचा ग्रुप शोधून काढणे मला अजिबातच कठीण गेले नाही. कारण ते खाणाखुणांनी एकमेकांशी संवाद साधत असल्याचे लांबूनही दिसत होते.

माझ्या डायरीत मी माझ्या स्वतःविषयीची माहिती आधीच लिहून ठेवली होती. मी ती डायरी त्यांना वाचायला दिली. ‘एक होती वादी’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी मी त्यांना भेटायला आले याचा त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांच्याकडून जे मिळेल ते मीसुद्धा माझ्या स्मरणशक्तीमध्ये रेकॉर्ड करून ठेवणार होते. आमच्या या चित्रपटातला काळ जुना होता. इंग्रजी वगैरे न शिकलेली अशी एक मुलगी त्यात दाखवली होती. खेडेगावात राहणाऱ्या त्या मुलीच्या कुटुंबीयांनी स्वतःच त्यांच्या अशा काही खाणाखुणा ठरवल्या होत्या; जेणेकरून त्यांना एकमेकांशी संवाद साधता येईल. एकंदरीत चित्रपटाचे कथानक अशा प्रकारचे असल्याने मी त्या पद्धतीची माहिती त्यांना विचारणार होते. मी त्यांच्याशी बोलत होते आणि त्याच वेळी त्यांच्या संवादाच्या खुणाही शिकत होते. ती मंडळी अर्थातच खाणाखुणांच्या माध्यमातून माझ्याशी बोलत होती आणि मीसुद्धा तोंडातून एकही शब्द न काढता त्यांच्याशी संवाद साधत होते. आपल्या भाषेत म्हणायचे तर एपंदरीत हा मौनातच संवाद सुरू होता.

आमच्यात संवाद सुरू असताना प्रचंड शांतता होती. आमच्या संवादाच्या जगात बरेच काही घडत होते; परंतु कुठल्याही प्रकारचा आवाज न होता ते सर्व सुरू होते. माझ्यासाठी या संवेदना खूपच वेगळय़ा होत्या. या सगळय़ामुळे मला खरे तर खूप ताण आला; पण त्याचबरोबर एकप्रकारची नवीन जाणीवही होत होती. जेव्हा आपण आपले एखादे इंद्रिय न वापरता त्या संवेदनांचे आदानप्रदान वेगळय़ा प्रकारे करायला जातो; तेव्हा इतर सर्व इंद्रिये खूपच सक्षमतेने काम करत असतात. मला तेव्हा ऐकू येत नव्हते; पण माझे डोळे किंवा माझी त्वचा ‘ऐकण्याचे’ काम करत होती. तुमच्या एखाद्या इंद्रियाकडून अपेक्षित असलेले कार्य होऊ शकत नाही, तेव्हा इतर इंद्रिये त्याची जागा किंवा कमतरता कशी भरून काढतात याची या प्रसंगातून मला प्रकर्षाने जाणीव झाली. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी ती एक वेगळीच कार्यशाळा होती. त्यामुळे ती संध्याकाळ माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी अशी ‘सकारात्मक संध्याकाळ’ आहे.

मी पूर्वी जिथे राहायचे तिथे कर्णबधिर व्यक्तींना प्रशिक्षण देणारी एक संस्था होती. तिथेही असाच कर्णबधिर मुलांचा एक ग्रुप होता. त्यांचाही आपापसांत चालणारा संवाद मी पाहिलेला आहे. संध्याकाळी वर्ग सुटल्यानंतर ते सगळे एकमेकांशी खाणाखुणा करत संवाद साधायचे. ते मी पाहिले होते आणि त्या मुलांचे तसे संवाद साधणे लहानपणापासूनच माझ्या मनावर कुठेतरी कोरले गेले होते. पण ‘एक होती वादी’च्या निमित्ताने मी कर्णबधिर अशा मोठय़ा माणसांना भेटले आणि त्यांनी त्यांच्या विश्वात मला सामील करून घेतले तेव्हा मला खूपच ‘स्पेशल’ वाटले.

या घटनेपासून माणसांना समजून घेण्याचा माझा ‘पेशन्स’ मात्र वाढला. आम्हा कलाकारांना नेहमीच असे वाटत असते की, एखाद्या भूमिकेच्या संदर्भात असे काहीतरी सापडायला हवे की ज्यामुळे ती भूमिका सखोल समजून घेण्याचा आमचा प्रवास सुरू होईल. त्या संध्याकाळच्या घटनेतून ‘वादी’चा मी वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लागले. त्या संध्याकाळी ती जी काही निःशब्द शांतता मी अनुभवली; ती माझ्या कानांत, मनात आणि शरीरात एकजीव झाली. शरीराकडे यंत्र म्हणून पाहिल्यास ते किती अद्भुत आहे याची जाणीव या शांततेने मला करून दिली. त्या संध्याकाळच्या शांततेने मला ‘वादी’चा आवाज मिळवून दिला आणि शांततेचा आवाज काय असतो, याची प्रचीतीही मला यातून आली.

शब्दांकन – राज चिंचणकर