सतर्क रहा, महाराष्ट्र विकू देऊ नका; राज ठाकरे यांचे तमाम मराठी जनांना आवाहन

रायगड शिवरायांची राजधानी, त्याच रयगडात सर्वाधिक डान्सबार असे विधान मनसे अध्य राज ठाकरे यांनी केले. तसेच सतर्क रहा, महाराष्ट्र विकू देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेकापच्या 78 व्या वर्धापनदिनी राज ठाकरे म्हणाले की, गेले दोन दिवस माझी तब्येत नरम आहे. मी आज फक्त जयंत पाटील यांच्या प्रेमाखातर इथे आलो आहे. आज मी फार मोठं भाषण करणार नाही. पण पावसाळा संपला की पनवेलमध्ये मी सभा नक्की घेईन. पूर्वीचे आजार ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे येतच नाही. हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचे राजकारण फार वेगळे नाहिये. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातून या पक्षात गेला. कुणी विचारलं तर म्हणतात व्हायरल होता. हे सध्या महाराष्ट्रात व्हायरल खुप होत आहेत. स्वातंत्र्य मिळण्याच्या 12 ते 13 दिवस आधी तो शेतकरी कामगार पक्ष. स्वातंत्र्यापूर्वी निर्माण झालेला हा महाराष्ट्रातला एकमेव राजकीय पक्ष. इतक्या वर्षानंतरही ते टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. मला अजूनही आठवत आहे. 1981 साली शिवसेनेचे पहिले अधिवेशन मुंबईत झालं होतं. त्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते. तेव्हा कम्युनिस्ट पक्षांत आणि शिवसेनेत विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी उदार आणि मोठ्या मनाचे होते. ते मोठं मन आता संकूचित व्हायला लागलं आहे सगळ्यांचं. आज त्या गोष्टीचा विचार करणं डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज आले आहेत. जयंतरावांनी मला निमंत्रण दिलं आणि फक्त मराठीवर बोला असं सांगितलं. दुसऱ्यांदा मी शेकापच्या व्यासपीठावर आलो आहे. पाच वर्षापूर्वी मी जयंतरावांच्या प्रचारासाठी आलो होतो. आज महाराष्ट्रातला आणि रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे. तो तुम्ही सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे पक्षाचा विचार न करता. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात हिंदी कशी आणता येईल आणि मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतोय. पण जे महाराष्ट्रात जे काम धंद्यासाठी येतात त्यांना मराठी कशी येईल याचा विचार मुख्यमंत्री नाही करत. महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि महाराष्ट्रातला भूमीपूत्र यांचा विचारच नाही. याचे सर्वात विदारक आणि भीषण स्वरूप हे रायगड जिल्हा. आज या रायगड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमीन चालल्यात कुठे चालल्यात. जमिनीचे व्यवहार करणारेही आपलेच, कुंपणच शेत खातंय. शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, उद्योगधंदे येत आहे. या उद्योगधंद्यात महाराष्ट्राच्या बाहेरून माणसं येत आहेत. आज मी ज्या पक्षाच्या व्यासपीठावर आलो आहे त्या पक्षाचे नाव आहे शेतकरी कामगार पक्ष. म्हणजे एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि उद्योग धंद्यांमध्ये मराठी कामगारही बरबाद होतोय. मग शेतकरी कामगार पक्षाचा काय उपयोग. या रायगड जिल्ह्याची जबाबादारी जयंत पाटील यांनी घेतली पाहिजे आणि तो शेतकरी बरबाद होणार नाही, या रायगड जिल्ह्यातील तरुण तरुणी या उद्योग धंद्यात लागले पाहिजे यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. शिक्षणमंत्री भुसे यांनाही म्हटलं की गुजरातमध्ये त्रिभाषा सुत्र आहे का? अमित शहा एकदा म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं, आम्ही बोललो की संकूचित कसे होतो? गुजरातमध्ये गुजराती नसलेल्या आणि अनिवासी भारतीयांना जमीन विकत घेता येत नाही असा कायदा आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून तुम्ही गुजरातला गेलात तर तुम्हाला शेतजमीन विकत घेता येत नाही. हे भारतात चालू आहे. जर ती जमीन विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे, त्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडू विशेष परवानगी घ्यावी लागते. प्रत्येक जण आपल्या राज्याचा आणि आपल्या माणसाचा विचार करत असतो मग आम्ही का नाही करायचा? आज रायगडात, ठाण्यात कोण जमीन घेतंय, कोण राहतंय हे कळत नाही. उत्तरेतले अनेक धनदांडगे आहेत त्यांनी कोकणात जमिनी विकत घेतल्या आहेत आणि आमचेच लोक विकत आहेत. आमच्या लोकांना हेच कळत नाहिये की यातून आम्हीच संपणार आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की उद्योगधंदे घेऊन जमीनीसाठी तुमच्याकडे लोक आले तर तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत. त्यांना म्हणा आम्ही सर्व शेतकरी तुमच्या कंपनीत पार्टनर म्हणून येणार. या जमिनी आपण विकल्या तर काही राहणार नाही. हे असंच चालू राहिलं तर अमराठी आमदार, खासदार, नगरसेवक निवडून येतील. नवी मुंबई विमातळावर 100 टक्के मराठी तरुण तरुणी कामाला लागले पाहिजे. सरकारने नवीन कायदा आणला आहे. तुम्ही जर आंदोलन केले तर तुम्ही कोण तर अर्बन नक्षल. तुम्ही जर कुठल्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूचदेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत. मराठी माणसांचा मानसन्मान ठेवूनच उद्योग आणावे लागतील. या राज्यात कुठे विकास होणार आहे आणि कुठून रस्ता निघणार आहे हे फक्त मंत्र्यांना माहित आहे. का कारण तेच ठरवणार आणि रस्ता होण्यापूर्वी तेच जमिनी विकत घेणार. आणि मग सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि हे गब्बर होणार. निवडणूक होण्याच्या तोंडावर पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडून पैसे घेणार हा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. कुणाही खोलात जाऊन पाहत आणि यापुढे आपलं काय होईल याचा विचार करत नाहीत असे राज ठाकरे म्हणाले.

सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. बंद झाले होते ना, मग कसे सुरू झाले. तेही अमराठी लोकांचे. म्हणजे इथून पिळला गेला तर डान्सबारच्या नावाने पिळून घ्यायचं. हा रायगड जिल्हा इथे शिवाजी महाराजांची राजधानी आहे. कल्याणच्या सुभेदाराची खणा नारळाने ओटी भरून त्यांना पाठवणारा आमचा राजा, त्यांची राजधानी असताना या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य संमेल भरवत आहे असं ऐकलंय. व्यापाऱ्यांचं चोपड्यातूत दुसरीकडे लक्ष गेलं तर बरं. पण हे फक्त गुजराती माणसांबद्दल प्रेम नाहिये. मराठी आणि गुजराती वाद व्हावा आणि त्यातून मतं काढण्यासाठी उद्योग सुरू आहेत. ज्या वेळेला आम्हाला समजेल की तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागत आहे, त्या वेळेला अंगावरच येऊ. कान, डोळे बंद ठेवू नका, आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. आज तुमची जमीन निघून जातेय उद्या तुमची भाषाही निघून जाईल. कालांतराने पश्चातापाचा हात तुमच्यावर मारायची वेळ येईल. सगळ्यांनी पैसे कमावले पाहिजे, सगळ्यांची कुटुंब उभी राहिली पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही. गुजरातमध्ये दोन वेळा बिहारी लोकांना हाकलून दिले. आधी 20 हजार लोकांना हाकलून लावले होते. अल्पेश ठाकूर यांनी आंदोलन केले होते, त्याच्या बातम्या नाहीत. त्या अल्पेश ठाकूरला भाजपमध्ये घेऊन मग आमदार केलं. माझी सगळ्यांना विनंती आहे की जागे रहा, कान उघडे ठेवा डोळे उघडे ठेवा सतर्क रहा महाराष्ट्र विकू देऊ नका असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.