
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकिरोधात बीडमधील परळी-वैजनाथ दिवाणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे वॉरंट काढण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी 2008 साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणाची परळी-वैजनाथ न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणामध्ये जामीन दिल्यानंतरही राज ठाकरे यांनी न्यायालयासमोर हजर राहणे वारंवार टाळले. यामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करत पुढील सुनावणीला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील सुनावणी 10 फेब्रुवारीला होणार आहे.
























































