
“संकट आता उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या दरवाजावर संकट टकटक करेल. जर आज तुम्ही गाफील राहिलात, तर कायमचे फसाल,” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांना सावध केले. ठाणे येथील संयुक्त सभेत बोलताना त्यांनी महायुती सरकार आणि भाजपवर प्रश्नांची सरबत्ती करत घणाघाती टीका केली.
पैशांचा पाऊस आणि विकासाचा दावा
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात घराघरात पैसे वाटले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. “एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे मते विकत घेण्यासाठी ५-५ हजार रुपये वाटायचे, हा कोणता विकास?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात ६६ ठिकाणी पैसे देऊन उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी मनसेच्या अशा उमेदवारांचे कौतुक केले ज्यांनी कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स नाकारून पक्षाशी एकनिष्ठ राहणे पसंत केले.
‘अदाणी’ आणि केंद्राच्या धोरणांवर प्रहार
राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या वाढत्या साम्राज्यावर कडाडून टीका केली. “देशातील विमानतळे, सिमेंट, वीज आणि बंदरे एकाच माणसाच्या हातात दिली जात आहेत. केवळ केंद्राचा दबाव आणि मोदींच्या नावावर अदाणींचे साम्राज्य विस्तारत आहे,” असे ते म्हणाले. सांताक्रूझ विमानतळाचा भूखंड अदाणींना विकण्याचा घाट घातला जात असून, मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांमधील मराठी ठसा पुसून ही शहरे गुजरातच्या प्रभावाखाली नेण्याचे हे कारस्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.
बदलापूर प्रकरण आणि कायदा सुव्यवस्था
बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीचा एन्काउंटर करण्यामागच्या हेतूवर राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली. “त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे होती, पण एन्काउंटर करून काही गुपिते दडपली तर नाहीत ना? धक्कादायक म्हणजे, या प्रकरणातील सह आरोपीला भाजपने थेट नगरसेवक म्हणून स्वीकारले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. सध्याच्या परिस्थितीत पोलीस हताश असून न्यायालयांकडूनही अपेक्षा राहिलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मराठी स्वाभिमानाचे रक्षण करा
“मुंबई, ठाणे, पालघर आणि कल्याण-डोंबिवली ही शहरे ताब्यात घेतल्याशिवाय मुंबईवर ताबा मिळवता येत नाही, हे ओळखूनच हे सर्व प्लॅन्स आखले जात आहेत. आपली संस्कृती आणि भाषेवर घाला घातला जात आहे,” असे सांगताना राज ठाकरे यांनी या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
“आम्हाला सत्तेचा हव्यास नाही, पण डोळ्यादेखत आपली शहरे परक्यांच्या हातात जाताना पाहवत नाही. हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे. १५ तारखेला ‘इंजिन’ आणि ‘मशाल’ जोरात धावली पाहिजे. आपला स्वाभिमान विकू नका आणि ही शहरे वाचवा.”
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
– भाजपचे लोकं पैसे वाटतायेत आणि शिंदेंचे लोकं पकडतायेत. काय चालुये सरकारमध्ये तेच कळत नाहीये.
– आज घराघरामध्ये पाच-पाच हजार रुपये वाटतायेत. एका बाजूला म्हणतायेत आम्ही विकास केला आणि मग पैसे वाटतायेत. नक्की काय सुरू आहे?
– कल्याण-डोंबिवलीत गुलामांचा बाजार मांडलाय. महाराष्ट्रात ६६ ठिकाणी पैसे वाटून फॉर्म मागे घ्यायला लावले.
– सोलापूरात फॉर्म मागे घेण्यासाठी आमच्या विद्यार्थी सेनेच्या शहरअध्यक्षाचा खून करण्यात आला. इथपर्यंत सरकार चाललंय?
– डोंबिवलीत शैलेश धात्रक, पूजा धात्रक आणि मनिषा धात्रक या एका कुटुंबातील तीन उमेदवारांना १५ कोटींची ऑफर देण्यात आली. पण ती ऑफर नाकारून ते तिघेही निवडणूक लढवत आहेत.
– सौ. राजश्री नाईक यांना ५ कोटी रुपयांची ऑफर दिली. ती ऑफर नाकारून त्या निवडणूक लढवत आहेत. आणि तुम्ही ५ हजारांमध्ये मतं विकताय?
– सुशील आवटे यांना १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली अशी अनेक लोकं आहेत. कुठून येतो हा पैसा?
– बदलापूरात एका लहान मुलीवर अत्याचार झाला त्यातील आरोपीला एन्काऊंटरमध्ये ठार मारला. आणि त्यातल्या सहआरोपीला स्विकृत नगरसेवक केला. हिंमत कशी होते यांची?
– रसमलाई (के. अण्णामलाई) सांगतोय मुंबईचा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही. आणि फडणवीस म्हणतायेत तो असं बोललाच नाही. मला वाटलं होतं फडणवीसांना कळतं. किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा? कोणासाठी करताय हे सगळं?
– माझ्या घरी गौतम अदाणीही येऊन गेले, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेले, अंबानी, आनंद महिंद्राही येऊन गेले. म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी?
– ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येईल, ज्यावेळी मुंबई-ठाणे यांसारख्या आमच्या शहरांवर संकट येईल. राज ठाकरे दोस्ती वगैरे बघणार नाही
– आमचं आणि गुजराती समाजाचं भांडण नाहीये. खरंतर जो डाव सुरू आहे त्याच्याविरोधात इथल्याही गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे.
– एक विमानतळ आणि एक पोर्टसोडून अदाणींचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव आणि मोदींचं नाव याच्या जोरावर हा माणूस देशभर पसरत गेलाय.
– इंडिगोच्या मालकाकडे या देशाची ६५ टक्के हवाई वाहतूक दिली आहे. त्यानंतर एक दिवस त्या मालकाने वाहतूक बंद केल्यानंतर वाहतूक ठप्प झाली. मग जर, एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते तर अदाणी काय करू शकतो?
– या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत पण सगळे व्हावेत एकच नाही.
– मी उद्योगपतींच्या विरोधातला माणूस नाहीये. पण एकाच उद्योगपतीवर इतकी मेहरबानी का? हे विचारणारा माणूस आहे.
– प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला तुम्ही नख लावताय?
– गौतम अदाणीने मुंबई विमानतळ ताब्यात घेतलं त्यानंतर विमानतळावर गरबा खेळवण्यात आला. यातून तुम्हाला काय सांगायचं होतं? वाजवायचे असतील तर फक्त ढोल -लेझिमचं वाजलं पाहिजे मुंबई विमानतळावर बाकी काहीच नाही.
– घोडबंदरची नॅशनल पार्कची जमीन एका उद्योगपतीला विकत आहेत. त्याला गणेश नाईकांनी विरोध केला त्यांचं अभिनंदन.
– ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे याचा आपण नीट विचार केला पाहिजे. ठाण्याचे अनेक प्रश्न आहेत जशी इथं लोकसंख्या वाढत आहे तसेच प्रश्न सुद्धा वाढतायेत.
– हे संकट सध्या तुमच्या उंबरठ्यावर उभं आहे. कोणत्याही क्षणी दरवाजा ठोठावेल. त्यामुळे आज जर चुकाल तर फसाल.
– हे ठाणं आपलं आहे. हे ठाणं टिकवणं, यांनी जो आराखडा आखला आहे तो उध्वस्त करणं तुमच्या हातात आहे.
– तुमचे जे मित्रपरिवारातील लोकं असतील, नातेवाईक असतील त्या सगळ्यांना सांगा शिवसेनेची मशाल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन जोरात धावलं पाहिजे.
– आम्हाला सत्तेचा हव्यास नाहीये वाईट या गोष्टीचं वाटतं डोळ्यादेखत ही शहरं जाऊ नये. डोळ्यादेखत इतरांनी ही शहरं घेऊ नयेत एवढ्यासाठीचं हे युद्ध सुरू आहे.
– येत्या १५ तारखेला आपण सर्व सतर्क राहा, कुठेही गाफील राहू नका. जर दुबार मतदार मतदान करायला कोणी आले तर तिथेच कानफडवायचे.































































