
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. सत्ताधारी काँग्रेसचे अलवर जिल्ह्यातील रामगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार जोहरीलाल मिणा (Congress MLA Johrilal Meena) यांचा मुलगा दिपक मिणासह चार जणांवर बलात्काराचा आरोप करण्यात असून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आरोपींनी पीडितेचा अश्लिल व्हिडीओही बनवल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. बलात्कार प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या मुलाचे नाव आल्याने भारतीय जनता पक्षाने थयथयाट केला असून सरकावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
मंडावर पोलीस स्थानकाचे प्रमुख नाथूलाल मिणा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, पीडितेवर महुआ-मंडावर रोडवरील समलेटी पॅलेस हॉटेलवर 24 फेब्रुवारी 2021 रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबियांनी दिली. बलात्काराचा व्हिडीओ काढून याच हॉटेलमध्ये पुन्हा-पुन्हा बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी मंडावर पोलीस स्थानकामध्ये पोस्को कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक मिणा, विवेक शर्मा (रा. थुमडा) आणि नेतराम समलेटी अशी आरोपींची नावे आहेत.
पीडितेच्या काकांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पीडितेची विवेक शर्मा याच्यासोबत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. यानंतर त्याने पीडितेला फूस लावून एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे आमदाराचा मुलगा आणि नेतराम समलेटी यांच्यासह एकूण 5 आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विवेक शर्मा बलात्कार करताना आरोपींनी याचा व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेवर पुन्हा-पुन्हा बलात्कार करण्यात आला.
मुख्य आरोपी विवेक शर्मा याने पीडितेला धमकी दिल्याचाही आरोप आहे. आरोपींना पीडितेला धमकी देऊन घरातील दागिने मागितले. एवढेच नाही तर मे महिन्यामध्ये पीडितेच्या घरी लग्न होते आणि लग्नासाठी ठेवलेले 15 लाख 40 हजार रुपयेही गायब झाले होते. या प्रकरणी रैनी पोलीस स्थानकात चोरीची तक्रारही दाखल करण्यात आली असून विवेक शर्मावरच चोरीचा आरोप आहे.
दरम्यान, मुलावरील आरोप काँग्रेस आमदार जोहरीलाल मिणा यांनी फेटाळून लावला आहे. हा आरोप खोटा आहे. हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.



























































