AB+ च्या जागी चढवले O+ रक्त, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप तरूणाचा मृत्यू

राजस्थानतील जयपुर शहरात असणाऱ्या नामांकित सवाई मान सिंह रुग्णालयामध्ये (SMS) एक धक्कादायक घटना घडली आहे. अपघातग्रस्त तरुणाला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 23 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

सचिन शर्मा (23) असे या तरुणाचे नाव असून तो बांदीकुई शहरातील रहिवासी आहे. सचिनचा कोटपुतली शहरामध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्याला भयंकर इजा झाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. यानंतर त्याला तत्काळ जयपूर येथील सवाई मान सिंग (SMS) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी सचिनला रक्त चढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. सचिनचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह (AB+) होता. पण वॉर्ड बॉयने सचिनला दुसऱ्या रुग्णाची ओ पॉझिटिव्ह (O+) रक्तगट असलेली स्लिप दिली. जेव्हा सचिनला ओ पॉझिटिव्ह रक्त चढवण्यात आले तेव्हा मात्र सचिनची प्रकृती जास्तच खालावली चुकीचे रक्त चढवल्यामुळे सचिनच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आले, परंतु सचिनची प्रकृती अधिकच खालावली आणि सचिनचा मृत्यू झाला.

तरुण मुलाचा निष्पाप बळी गेल्यामुळे सचिनच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण वाढल्यानंतर ही बातमी सरकारपर्यंत पोहोचली. त्यानंतर सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सवाई मान सिंग रुग्णायलाचे (SMS) अधीक्षक अचल शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आहे.