भाविकांच्या नव्हे, अदानींच्या सोयीसाठी शक्तिपीठ महामार्ग!  एक इंचही जमीन देणार नाही; ग्रामस्थांचा निर्णय 

राज्य सरकारचा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा हेतू हा भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समूहाचे गौणखनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून परदेशात निर्यात करायचे असल्यानेच भाविकांचे कारण दाखवून हा प्रकल्प जनतेच्या माथी मारला जात आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेळप (ता. आजरा) येथे झालेल्या शक्तिपीठ विरोधी बैठकीत केली. यावेळी येथील ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये एकजूट होत एक इंचही जमीन न देण्याचा निर्णय घेतला.

राजू शेट्टी म्हणाले, शेळप गावाची याआधी सर्फनाला प्रकल्पासाठी 350 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. सध्या गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून, यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. सध्या या गावाजवळून संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झाला आहे. कोल्हापूरमधून गोव्याला जाण्यासाठी एकूण सात रस्ते असून, त्यापैकी 4 राष्ट्रीय महामार्ग व 3 राज्य मार्ग सध्या अस्तित्वात आहेत. मग 8 वा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

राज्य सरकारचा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा हेतू हा भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समूहाचे गौणखनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून परदेशात निर्यात करायचे आहे. या महामार्गावरून अदानीचे गौणखनिज जाणार व त्याचा भार राज्यातील वाहनधारकांच्या टोलमधून वसूल केला जाणार आहे. त्याबरोबरच या महामार्गातून 50 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीचा खटाटोप आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली. यावेळी स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.