नाराजी नाट्यानंतर राज्यसभेतील मार्शलचा ड्रेसकोड बदलला, आता दिसणार जोधपुरी सुटात

1530

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेच्या 250 व्या बैठकीपासून राज्यसभेच्या मार्शल्सना लष्करी थाटाचा गणवेश देण्यात आला होता. त्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांसह उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांनीही उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीची दखल घेत आता राज्यसभेच्या मार्शल्सना गणवेश म्हणून जोधपुरी सूट देण्यात आला आहे. मात्र या गणवेशावर ते जोधपुरी पगडी मात्र परिधान करणार नाहीत. 21 नोव्हेंबरपासून मार्शल्सनी लष्करी थाटाची कॅप घालणे बंद केले होते. आता त्यांना ऑलिव्ह ग्रीन रंगाचा जोधपुरी सूट पुरविण्यात आला असून नव्या गणवेशात मार्शल्सही खुश दिसत आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवसापासून राज्यसभा मार्शल्स भव्य जोधपुरी सुटमधे सभापतींच्या शेजारी उभे दिसू लागले आहेत. नवा गणवेश लष्करी थाटाचा वाटत नसल्याने विरोधी खासदारांसह सर्वांचीच नाराजी दूर झाली आहे. एका काँग्रेस सदस्याने नव्या गणवेशाबाबत बोलतांना “व्हेरी स्मार्ट” असे मत जाहीरपणे बोलून दाखवले आहे. गेली 50 वर्षे राज्यसभा मार्शल्स सभागृहात करड्या रंगाचा जोधपुरी सूट आणि पगडी अशा गणवेशात वावरत होते.

मार्शलनीच केली होती गणवेश बदलण्याची मागणी
नव्या लष्करी थाटाच्या गणवेशामुळे काँग्रेस खासदारांनी देशात “मार्शल लॉ” सुरू झालाय का? अशी टिप्पणीही केली होती. त्यामुळे राज्यसभा प्रशासनाने आपला गणवेश बदलावा अशी आग्रही मागणी मार्शल्सनीच केली होती. त्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी तात्काळ मार्शल्सचे गणवेश बदलण्याचे आदेश दिले होते. अखेर नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिजाइनने देशातील 4-5 विधानसभांतील गणवेशांचा अभ्यास करून राज्यसभा मार्शल्ससाठी देशी थाटाचा जोधपुरी गणवेश तयार केला, अशी माहिती राज्यसभा सचिवालयाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या