राज्यसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार, खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

कृषी विधेयकावरील चर्चेवेळी गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेतून आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचे निलंबन मागे घेतले जात नाही तोवर राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आज विरोधकांनी एकमुखाने घेतला. त्यामुळे राज्यसभेत विरोधकांच्या अनुपस्थितीतच आयआयटी संशोधन विधेयक, बँकिंग सुधारणा विधेयक मंजूर करून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहपूब करण्यात आले.

राज्यसभेतील प्रकारामुळे देशाचे राजकारण तापले असून राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या आठही खासदारांनी कालपासूनच संसद भवनात पथारी पसरून आंदोलन केले. कालची रात्रही या खासदारांनी संसद भवनाच्या पटांगणातच काढली. त्यामुळे खासदारांवर झालेली कारवाई ही अवाजवी असल्याची भावना विरोधकांकडून व्यक्त होत असून जोपर्यंत निलंबित खासदारांचे निलंबन परत घेतले जाणार नाही तोपर्यंत विरोधी पक्ष कामकाजात सहभागी होणार नाही, असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले.

उपसभापतींची चाय पे चर्चा आणि उपोषण
राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे सर्वांच्या रडारवर असलेले उपसभापती हरिवंश सिंग यांनी आज सकाळीच सौजन्यशीलता दाखवत घरी बनवून आणलेला चहा धरणे आंदोलन करणाऱया निलंबित खासदारांना देऊ केला. चाय पे चर्चा करून राज्यसभेत निर्माण झालेला तणाव निवळवण्याचा प्रयत्न उपसभापतींनी केला खरा, मात्र निलंबित खासदारांनी हरिवंश सिंग यांचा चहा नाकारला. त्यानंतर राज्यसभेत झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र खेद व्यक्त करत हरिवंश सिंग यांनी एक दिवसाच्या उपोषणाचीही घोषणा केली. दरम्यान, विरोधकांच्या गैरहजरीत आयआयटी संशोधन विधेयक व बँकिग सुधारणा विधेयकाला राज्यसभेने मंजुरी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या