
सातारा बसस्थानकाबाहेर राखी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या स्टॉलचालकांनी 3 हजार रुपयांप्रमाणे खंडणी द्यायची; अन्यथा ऍट्रॉसिटीच्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताने साहित्याची तोडफोड करत राडा घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना दि. 2 ते 6 रोजी या कालावधीत घडली आहे.
जयवंत शिवदास कांबळे उर्फ जेके असे संशयित आरोपीचे नाव असून, याप्रकरणी संजय जनार्दन पवार (वय 54, करंजे पेठ, सातारा) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पवार यांनी राखी पौर्णिमेनिमित्त बसस्थानकासमोर स्टॉल लावला आहे. यावेळी संशयित जेके तेथे आला व त्याने ‘तुमच्या एकएकाचे हातपाय तोडेन. तुम्हाला ऍट्रॉसिटीच्या केसमध्ये अडकवीन. प्रत्येकाने मला 3 हजार रुपये द्यायचे,’ असे म्हणत स्टॉलसमोरील प्लॅस्टिकची खुर्ची रस्त्यावर आपटून त्याचे नुकसान केले.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ‘तुम्ही स्टॉलवाले पैसे देत नाही ना, तुम्ही कसा धंदा करताय तेच बघतो,’ असे म्हणत शिवीगाळ करून दमदाटी केली. वारंवार खंडणीसाठी त्रास देत असल्याने अखेर पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक भिसे पुढील तपास करत आहेत.



























































