मंदिर पाडून नव्हे, मोकळ्या जागेवर उभारली होती मशीद, मुस्लिम पक्षकारांचा युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांनी हिंदूंचे दावे खोडून काढण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. बाबरने अयोध्येतील मोकळय़ा जागेवर बाबरी मशीद उभारली होती. मशिदीसाठी कुठलेही मंदिर पाडले नव्हते, असा युक्तिवाद मुस्लिम पक्षाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान केला.

या प्रकरणात युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना 18 ऑक्टोबरची ’डेडलाइन’ दिली आहे. त्यानुसार हिंदू पक्षकारांनी आपले युक्तिवाद पूर्ण केले असून सध्या मुस्लिमांच्या वतीने बाजू मांडली जात आहे. घटनापीठातील न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांनी बाबरने मशीद मोकळय़ा जागेवर उभारली होती की मंदिर पाडून, असा सवाल मुस्लिम पक्षकारांना केला. त्यावर मुस्लिम पक्षाचे वकील जफरयाब जिलानी यांनी उत्तर दिले. मशीद उभारली ती जागा मोकळी होती. मशिदीसाठी कोणतेही मंदिर पाडलेले नाही, असे त्यांनी न्यायमूर्तींना सांगितले.

प्रभू रामचंद्र आम्हालाही आदरणीय!
हिंदूंच्या श्रद्धेवर प्रश्न कसा काय उपस्थित केला जाऊ शकतो, अशी विचारणा सोमवारी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी केली. त्यावर मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी, आमचे पक्षकार प्रभू रामचंद्र व त्यांच्या जन्मभूमीचाही आदर करतात. या देशात जर राम आणि अल्लाह यांचा आदर केला नाही तर देश संपेल, असेही त्यांनी नमूद केले.