पुलकित पृथ्वी, पुलकित वायू… अवघा हिंदू धन्य जाहला! अयोध्येत राममंदिराचा पाया रचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपली… कोट्यवधी हिंदुस्थानींनी उराशी बाळगलेले स्वप्न अखेर साकार झाले. पवित्र अयोध्या नगरीत… प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी विश्वालाही भूषण वाटेल अशा अतिभव्य राममंदिराचा पाया रचला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सुमुहूर्तावर या पावन वास्तूचा पायाभरणी सोहळा पार पडला तेव्हा प्राणांची ओंजळ करून टीव्हीवरून हा सोहळा पाहणार्‍या हिंदुस्थानच्या घराघरात कोटी कोटी नेत्रांनी प्रभू रामचंद्रांची ओवाळणी केली… लक्ष लक्ष कंठांनी रामरायाचा जयजयकार केला. या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरलेली पृथ्वी पुलकित झाली… वायू पुलकित झाला… चराचर पुलकित झाला… अवघा हिंदू धन्य झाला… राममय झाला… ‘रामजन्मभूमी’चा वनवास संपला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा हनुमानगढी येथे पोहोचले. हनुमानजींचे दर्शन घेऊन आरती केली. दुपारी ठीक बारा वाजता पंतप्रधान मोदी रामजन्मभूमी स्थळ येथे पोहोचले. सर्वप्रथम रामलल्लांचे दर्शन त्यांनी घेतले, साष्टांग दंडवत घातला. पारिजातकाच्या वृक्षाचे रोपण केले. त्यानंतर भूमीपूजनस्थळी पोहोचले.

चांदीचा कुंभकलश मोदी विसरतात तेव्हा…

भूमिपूजनावेळी पंतप्रधान मोदी यांनी चांदीचा एक कुंभकलश अर्पण केला. मात्र भूमिपूजनाच्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर हा कुंभकलश कारमध्ये राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते माघारी गेले आणि सुरक्षा अधिकार्‍याला कारमधील कुंभकलश आणायला सांगितले. त्यानंतर ते पूजेला बसले.

वेदमंत्रोच्चाराच्या जयघोषात भूमिपूजन विधी झाला. पायाभरणीचा शुभमुहूर्त 12.44 वाजताचा होता. ठीक 12.44 वाजता भूमिपूजन झाले. पंतप्रधानांच्या हस्ते चांदीची वीट अर्पण करून भूमिपूजन करण्यात आले. पायाभरणी सोहळ्याचे पौरोहित्य दुर्गा गौतम यांनी केले. 1989 पासून जगभरातून भक्तांनी राममंदिरासाठी विटा पाठविल्या. तब्बल 2 लाख 75 हजार विटांतील 100 विटांवर जय श्रीराम कोरलेले आहे. यातील नऊ विटा पुजेत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत, राममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास आणि संत-महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत राममंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा झाला.

बाळासाहेब ठाकरे आणि आडवाणी यांचेच श्रेय- लता मंगेशकर

अनेक राजांचे, अनेक पिढ्यांचे आणि अवघ्या जगातील रामभक्तांचे अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे पुनर्निर्माण होत आहे; शिलान्यास होत आहे. मंदिर निर्माणाचे सर्वात मोठं श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांनी या मुद्दय़ावरून रथयात्रा सुरू करून संपूर्ण हिंदुस्थानात जनजागृती केली होती त्या लालकृष्ण आडवाणी यांचे आहे, असे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी म्हटले आहे.

राममंदिर बनेल एकजुटीचे प्रतीक! पंतप्रधान मोदी यांचे उद्गार

शरयू नदीच्या तीरावर आज सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. राममंदिर हे राष्ट्रीय भावनेचे आणि एकजुटीचे प्रतीक आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.राममंदिर भूमिपूजनानंतर संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल राममंदिर ट्रस्टचे आभार मानले. तसेच जगभरातील रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. राममंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळत राहील, असे पंतप्रधान म्हणाले.

सरसंघचालक भागवत यांना लालकृष्ण आडवाणी यांची आठवण

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण झाले. भागवत म्हणाले हा आनंदाचा क्षण आहे. हिंदुस्थानच्या नवनिर्माणाचा शुभारंभ आहे. राममंदिरासाठी अनेकांनी त्याग केला, बलिदान दिले. यावेळी भागवत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा उल्लेख केला. आडवाणी आज घरातून हा कार्यक्रम बघत आहेत, असे ते म्हणाले.

कोट्यवधी जनतेने पाहिला सोहळा

अनेक पिढ्यांचा त्याग, संघर्ष आणि बलिदानातून आज रामजन्मभूमीत मंदिराच्या पायाभरणीचे स्वप्न पूर्ण झाले. हा उत्साहाचा, आनंदाचा, मंगलमय सोहळा अनेकांनी घरबसल्या अनुभवला. कोरोना संसर्गामुळे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याचे विविध वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले. देश-विदेशातील कोट्यवधी हिंदूंनी हा क्षण डोळ्यांत साठवून ठेवला.  

काय म्हणाले पंतप्रधान

  • राममंदिरासाठी अनेक पिढय़ांनी आयुष्य अर्पण केले. समर्पण त्याग, बलिदानातून हे स्वप्न साकार होत आहे. या सर्वांना मी वंदन करतो. आज केवळ इतिहास रचला जात नसून इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.
  • कित्येक वर्षांपासून श्रीरामांना तंबूत रहावे लागले. कोट्यवधी जनतेचे आज स्वप्न साकार होत आहे. पर्णकुटीत राहणार्‍या रामलल्लांचे भव्य मंदिर उभे राहणार आहे.
  • राम मनामनात आहे. राम हिंदुस्थानच्या संस्कृतीचा आधार आहे.
  • प्रभू श्रीराम मर्यादापुरुषोत्तम आहेत. कोरोना संक्रमणकाळात मर्यादांचे पालन होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हाही मर्यादा आणि संयमाचे दर्शन घडले होते.  

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले. प्रभू श्रीरामांच्या विजयामध्ये खारीपासून वानरांपर्यंत, वनामध्ये राहणार्‍यांपर्यंत सर्वांना सहभागी होण्याचे सौभाग्य मिळाले. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला. यात लहान लहान मुलांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी मावळय़ांनी सहवार्य केले. महाराज सोहेलदेव यांना लढाईमध्ये गरिबांनी मदत केली. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींबरोबर दलित, मागास, आदिवासींचा सहभाग होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.