
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी प्रत्येक कुटुंबाने एक वीट आणि 11 रुपये द्यावेत असे आवाहन केले आहे. भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या व्यक्तीने अशा प्रकारे आवाहन करण्याची ही पहिलीत वेळ आहे. आदित्यनाथ यांनी झारखंडमधल्या एका सभेत बोलताना हे आवाहन केले आहे.
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार सुरू असून भाजपचे उमेदवार नागेंद्र महातो यांच्या प्रचारासाठी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. बागोदर इथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना आदित्यनाथ म्हणाली की 500 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे सुटला. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष यांना या प्रश्नावर तोडगा निघावा असे वाटतच नव्हते.
जाहीर सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की लवकरच भव्य राम मंदिराच्या निर्माणाचे काम सुरू होणार आहे. यासाठी झारखंडमधल्या जनतेलाही बोलावणार आहे. झारखंडमधल्या लोकांनी मंदिर निर्माणासाठी येत असताना घरातून एक वीट आणि 11 रुपये आणले पाहिजेत असं आवाहन आदित्यनाथ यांनी केलं आहे.



























































