Ayodhya Ram Temple – प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी जन्माला आलेल्या मुस्लिम मुलाचे नाव राम रहीम ठेवण्याचा निर्णय

22 तारखेला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्री रामाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. याच दिवशी मुस्लिम कुटुंबात बाळाचा जन्म झाला. 22 जानेवारीचे महत्त्व लक्षात घेऊन या मुलाचे नाव राम रहीम असे ठेवण्याचा त्याच्या आईने निर्णय घेतला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे बाळाच्या आईने म्हटले आहे. जिल्हा महिला रुग्णालयात फरझानाची प्रसुती झाली होती आणि तिने आपल्या मुलाचे नाव राम रहीम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे या रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर नवीन जैन यांनी सांगितले. या बाळाचे नाव राम रहीम ठेवण्याची कल्पना बाळाच्या आजीने म्हणजेच हुस्नबानो यांनी दिली होती. ही कल्पना फरझाना यांना आवडली होती.

सीमा द्विवेदी या कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या कार्यवाहक प्रभारी आहेत. त्यांनी सांगितले की 22 जानेवारीला या रुग्णालयात 25 बाळांनी जम्न घेतला. यातील 10 मुली असून उर्वरीत मुले आहेत. ही सगळी बालके आणि त्यांच्या माता या सुखरुप आणि सुदृढ आहेत असे द्विवेदी यांनी सांगितले. 22 तारखेला या रुग्णालयात जन्मलेल्या मुलांच्या मातांनी आपल्या मुलांची नावे रामावरून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपण आपल्या मुलांची नावे राघव, राघवेंद्र, रघू, रामेंद्र अशी ठेवणार असल्याचे या मातांनी सांगितले आहे. तर मुलींची नावे जानकी, सीता अशी ठेवणार असल्याचे मुलींच्या मातांनी सांगितले आहे. द्विवेदी यांनी सांगितले की 22 तारखेला प्रसुती व्हावी यासाठी सिझेरिअनचाही काही मातांनी हट्ट धरला होता.

श्रीराम अयोध्येला परतले!

अयोध्या नगरीत ‘न भुतो न भविष्यति’ असा सोहळा पार पडला. 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात दुपारी 12 वाजून 29 मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रघोषात प्राणप्रतिष्ठापना विधी संपन्न झाल्यावर मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली आणि समस्त विश्वाला श्री रामलल्लांचे मुखदर्शन घडले. अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी असंख्य कारसेवकांनी लढा देत दिलेले बलिदान आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. श्रीरामजन्मभूमी लढय़ात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह असंख्य हिंदूंनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले.