
दुर्गेश आखाडे । रत्नागिरी
रत्नागिरी सारख्या छोट्याशा शहरात बालनाट्य…एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा गाजवत मुंबई गाठलेल्या रमा सोहनी-रानडे हिने व्यवसायिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवला आहे. हम पांच मधील माधुरी या भूमिकेसाठी झी कॉमेडी अॅवार्ड मध्ये सर्वेात्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदाच असं घडलं की एकाच नाटकातील पाचही अभिनेत्रींना सर्वेात्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
रमा सोहनी ही रत्नागिरीतील फाटक हायस्कूल मध्ये शिकत होती. त्यावेळी तिने बालनाट्यातून अभिनयाचा श्रीगणेशा गिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिकताना तिचा एकांकिका, युवा महोत्सव सहभाग असायचा. राज्य नाट्य स्पर्धेत संकल्प कलामंच यांच्या त्रिवेणी या नाटकात तिने भूमिका केली. कामगार कल्याण नाट्यस्पर्धेत त्रिवेणीतील भूमिकेसाठी रमा सोहनी हिला सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचं तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर रमा सोहनी नाट्यशास्त्र पदवी अभ्यासासाठी मुंबईत गेली. मुंबई विद्यापीठातून रमाने नाट्यशास्त्रात एम.ए. ही पदवी घेतली. मग रमा सोहनी-रानडे हिने पुढचं पाऊल व्यवसायिक रंगभूमीवर टाकले. कानाची घडी तोंडावर बोट हे तिचं पहिलं व्यवसायिक नाटक ठरलं.
त्यानंतर दत्तविजय प्रॉडक्शनच्या संकेत तांडेल लिखित-दिग्दर्शित हम पांच या नाटकात माधुरीची भूमिका करायला सुरुवात केली. दत्ता घोसाळकर हे या नाटकाचे निर्माते असून सुनील पुजारी सहनिर्माते आहेत. या विनोदी नाटकात रमा सोहनी-रानडे सोबत वनिता खरात, पूर्वा कौशिक, नेहा पाटील, प्रियांका हांडे यांना झी कॉमेडी अॅवार्ड मध्ये विनोदी अभिनेत्रीचे नामांकन जाहिर झाले. त्यांच्या स्पर्धेत भार्गवी चिरमुले आणि अन्य तीन गाजलेल्या विनोदी नाटकातील प्रमुख अभिनेत्री होत्या. अभिनेते विजय कदम, देवेंद्र पेम, विश्वास सोहनी या परीक्षकांनी हम पांच मधील पाचही अभिनेत्रीना सर्वेात्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार जाहिर केला. या मध्ये रत्नागिरीच्या रमा सोहनी-रानडे हिचा समावेश आहे. रत्नागिरी सारख्या ग्रामीण भागात अभिनयाचे धडे गिरवत पुढे व्यवसायिक रंगभूमीवर रमाने मिळवलेले यश रत्नागिरातील भावी कलाकारांसाठी एक आदर्श ठरणार आहे.


























































