‘रमाधाम’चा देशाला अभिमान वाटेल, तीन मजली इमारतीचे नूतनीकरण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खोपोली वृद्धाश्रमाचा शेकडो आजी-आजोबांना मोलाचा आधार राहिला आहे. खोपोलीतील या रमाधाम वृद्धाश्रम इमारतीचा कायापालट करण्यात आला आहे. ध्यान मंदिर, मनोरंजन केंद्र, प्रशस्त गार्डन, अत्याधुनिक आरोग्य सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत. भव्य तीन मजली इमारतीचे नूतनीकरण पूर्ण झाले असून सर्व सोयींनीयुक्त प्रशस्त वृद्धाश्रमाचा देशाला अभिमान वाटेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

माँसाहेबांनी ज्येष्ठांच्या सेवेचा आखून दिलेला वसा रमाधाम वृद्धाश्रमात अखंडपणे जपला जात आहे. वृद्धांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी इमारत नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता जवळपास पूर्ण झाले असून रंगरंगोटी बाकी आहे. या संपूर्ण कामाचा आणि सोयीसुविधांचा आढावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकताच घेतला. ‘रमाधाम’चे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी संपूर्ण बांधकाम व नियोजनाची माहिती देसाई यांना दिली. कामाबाबत समाधान व्यक्त करून सुभाष देसाई यांनी राज्यातच नव्हे तर देशात हे वृद्धाश्रम नावाजले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी एल ऍण्ड टी कंपनीचे अधिकारी माधव देशपांडे, श्रीधर पावसकर, गोरेगाव विधानसभा संपर्कप्रमुख अजय नाईक आदी उपस्थित होते

अशा असतील सुविधा
तीन मजली इमारतीमध्ये वृद्धांसाठी प्रशस्त हॉल, मनोरंजन केंद्र, प्राथमिक उपचार केंद्रात अत्याधुनिक आरोग्य सुविधा, ध्यान मंदिर, डायनिंग हॉल अशा सुविधा असतील. याशिवाय आजी-आजोबांचे मन प्रसन्न राहावे यासाठी विविध फळाफुलांनी फुललेले गार्डन तयार होत आहे.