अर्धवटराव सांगतात, हसा आणि हसवत रहा!

337

>> रामदास पाध्ये

लॉकडाऊनमध्ये वेळ कसा जाईल, हा प्रश्न मला पडला नाही. उलट मी जास्त बिझी झालो. आम्ही ‘झी मराठी’वर नकी मालिका घेऊन आलो, ‘घरात बसले सारे’. लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांना काहीतरी नवीन द्यावं यासाठी मला चॅनेलकडून विचारणा झाली. मग मी त्यांना सांगितलं की मला बाहुल्यांचं करायला आवडेल. तुम्हाला अर्धवटराव, आवडा अक्का’ आणि त्यांच्या गमती जमती माहीत आहेतच. आता त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा चंदन, सून सुनयना आणि नातू छोटू सिंग आहेत. चंदन आणि सुनयना यांच्यातील तू तू मै मै आणि त्यांच्या जीवनात घडणाऱया मजेशीर गोष्टी आम्ही दाखवतो. या मालिकेच्या कामामध्ये आम्ही सगळे पाध्ये कुटुंब गुंतलो आहोत. घरातून सगळं शूटींग, एडिटिंग करायचं असतं. मी, माझी पत्नी अपर्णा, मुलगा सत्यजित आणि त्याची बायको ऋजुता आणि माझा दुसरा मुलगा परीक्षित असे पाच जण काम करतो. मालिकेला सत्यजितचं दिग्दर्शन आहे. कॅमेरा परीक्षित सांभाळतो. मी आणि अपर्णा आम्ही बाहुल्यांचे आवाज वाढतो, त्यांना हँडल करतो. एकाच वेळेला पाच-सहा बाहुल्या असल्या की तेवढं सोपं नसतं.

लॉकडाऊनचा काळ असं बरंच शिकवून गेलाय. अडचणी येतात, आव्हानं असतात, पण कामाप्रति आपली निष्ठा असेल तर मार्ग नक्की सापडतो. मी देशविदेशात अनेक कार्यक्रम केले. गेल्या दीड ते दोन वर्षांत आम्ही दहा देशांत जाऊन आलो. अर्धवटरावाची शताब्दी साजरी केली. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम हिंदुस्थानातही केले. प्रेक्षकांसोबत संवाद साधण्याची, लाइव्ह शोची मजाच और असते. पण आता मी टीव्ही सीरिजसाठी घरातून जे सगळं करतोय, ते मी याआधी कधी केलं नव्हतं. हा खूप कमालीचा अनुभक आहे. जेव्हा आपल्याकडे सेट नाही, मिनिमम लाइट आहे, कुणी मदतनीस नाही, अशावेळी काय करायचे, त्यावर मार्ग कसा काढावा,हे या दिवसांनी शिकवलं. बाहुल्यांचे काही नवीन प्रकार सादर करता येतील का, याचा विचारही रोज करत असतो. त्यातून क्रिएटिव्ह कृत्तीला चालना मिळते.

कोरोनाच्या संकटामुळे आपण एका जागी अडकून पडलो आहोत. बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकांचे मानसिक खच्चीकरण होतं. अशावेळी मी त्यांना सांगेन की घरात राहून छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद घेत रहा. छंद जोपासा. त्यातून आनंद मिळका. प्रत्येक दिवस महत्त्काचा आहे असं समजा. काहीतरी नवीन आत्मसात करा. आपोआप तुम्ही नकारात्मक विचारांपासून दूर जाल. आमचे अर्धवटराव नेहमी तेच सांगत असतात, हसा आणि हसवत रहा. आणि हो, सुरक्षित रहा. विनाकारण घराबाहेर पडू नका. नियमांचे पालन करा.

आपली प्रतिक्रिया द्या