
जुगाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांत आणि भाजप नेत्यात हाणामारी झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या घटनेत चार पोलीस जखमी झाले असून भाजप नेत्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील नेहटा गावात ही घटना घडली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जुगार खेळण्यासाठी काही जण जमले होते. बुधवारी संध्याकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना गावातल्या रामलीला चौकात उघडपणे जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी चौकात जाऊन धाड टाकली. पोलिसांना पाहून जुगारी तिथून पळ काढू लागले. पण, काही जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं.
पण, स्थानिक भाजप नेता जुगल किशोर हा तिथे पोहोचला. त्याने आधी पोलिसांवर लाचखोरीचे आरोप करून जुगाऱ्यांना सोडत असल्याचा आरोप केला आणि नंतर स्वतःच जुगाऱ्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथलं वातावरण तंग झालं आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व भाजप नेता तसंच तिथे उपस्थित असलेल्या स्थानिकांमध्ये हाणामारी झाली. प्रकरण वाढतंय असं लक्षात आल्यावर पोलिसांनी अधिकची कुमक मागवली आणि तीन जुगाऱ्यांना अटक करत हा प्रकार नियंत्रणात आणला.
पोलिसांनी जुगाऱ्यांना पोलीस स्टेशनवर नेल्यानंतर पाठून काही ग्रामस्थ आणि अन्य एक स्थानिक भाजप नेता पोलिसांवर आरोप करत तिथे आला. त्यांनी पोलिसांवर जुगल किशोर याला मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ओमवीर खडगवंशी यांनी देखील पोलिसांवर आरोप केले आहेत. जुगल किशोर याला मारहाण झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं असल्याचंही ओमवीर यांचं म्हणणं आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. जुगाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला असून त्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जुगाऱ्यांकडून आणि तिथे उपस्थित ग्रामस्थांकडून मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील सामान हिसकावून घेण्याचाही प्रयत्न झाला, असं मिश्रा यांचं म्हणणं आहे.

























































