रामरक्षा गोशाळेतील शेडचे काम अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या रामरक्षा गोशाळा येथे गायींच्या शेडची तसेच पशू खाद्य साठवणूकीसाठी उभारण्यात येत असलेल्या शेडचे काम गतीने चालू असून चालू असलेले काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा पशू संवर्धन उपआयुक्त डॉ. एन.आर. पानढवळे यांनी दिली. यावेळी डॉ. आर.आर.ठाकुर,पशू विकास अधिकारी श्रीनिवास पाथरकर हे उपस्थित होते.

रामरक्षा गोशाळेत नवीन दोन शेड उभारले जात आहेत. गायींच्या निवासासाठी तसेच पशू खाद्य साठवणूकीसाठी हे शेड उभारले जात आहेत. कृषि विभागाने यासाठी निधी दिला असून या पार्श्वभूमीवर अधिकारी वर्गाने चालू असलेल्या कामाची पाहणी केली. रामरक्षा प्रतिष्ठान अंतर्गत रामरक्षा गोशाळा येथे सध्या 263 गायींचा सांभाळ केला जात आहे. यावेळी अधिकारी वर्गाने शेड उभारणीच्या कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. सोबतच चारा साक्षरता अभियानांतर्गत वाळलेल्या वैरणीवर युरिया प्रक्रीया करण्याचे प्रात्यक्षीक करुन दाखविले.

जनावरांची प्रकृती सदृढ राहण्यासाठी, दुभत्या जनावरांसाठी अपेक्षीत उत्पादन मिळविण्यासाठी, त्यांच्या समाधानकारक वाढीसाठी गायीचा आहार समतोल असणे आवश्यक असल्याचे डॉ. पानढवळे यांनी सांगीतले. डॉ. गोरक्ष चितळे व कर्मचाऱ्यांनी सोयाबीनच्या गुठी, मिठ, गुळ, पाणी याचे मिश्रण करुन दाखविले. यावेळी गोशाळेचे प्रमुख गोपालदास कोठारी, रतन कोठारी, आत्माराम शास्त्री महाराज, राजू महाराज दराडे, श्याम दरक, आशिष काबरा, श्याम मंत्री, पप्पू शर्मा, सुरेश करवा, विश्वजीत तोतला, सुरज कोठारी आदी उपस्थित होते.

रामरक्षा गोशाळेच्या एकुण कामाची पाहणी यापुर्वी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत राज्यस्तरीय अशासकीय सदस्य डॉ. सुनिल सुर्यवंशी, सहा.पशू संवर्धन आयुक्त डॉ. एम.जे. देशपांडे आदींनी केली होती.